आता 'व्हाईट हाऊस'मधील टेस्ट कीटवर होणार कोरोना चाचणी; काही मिनिटांत कळणार संसर्ग - Covid test kits from white house coming to India amid corona crisis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आता 'व्हाईट हाऊस'मधील टेस्ट कीटवर होणार कोरोना चाचणी; काही मिनिटांत कळणार संसर्ग

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 एप्रिल 2021

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना कहर सुरूच असून जगभरातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना कहर सुरूच असून जगभरातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. विविध वैद्यकीय उपकरणांसह औषधे व इतर साहित्याच्या माध्यमातून भारताकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे भारताला काहीसा दिलासा मिळू लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही दोन दिवसांपूर्वीच भारताला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

बिडेन यांनी दिलेल्या आश्वासनानुसार गुरूवारपासून अमेरिकेतून विविध वैद्यकीय साहित्य भारतात येण्यास सुरूवात होणार आहे. युएस एजन्सी फॅार इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) कडून मदत पाठविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 10 लाख रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (RDTs)  या टेस्ट कीटचाही समावेश आहे. या टेस्ट कीट व्हाईट हाऊसमध्ये वापरल्या जातात. या कीटच्या माध्यमातून 15 मिनिटांहून कमी कालावधीत संसर्ग झाला आहे किंवा नाही हे समजते. त्यामुळे भारतात वेगाने चाचण्या होण्याच्यादृष्टीने या कीट फायदेशीर ठरणार आहेत. 

अमेरिकेकडून पहिल्या विमानाने 440 अॅाक्सीजन सिलेंडर व रेग्युलेटर्स, 9 लाख 60 हजार टेस्ट कीट आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 1 लाख मास्क पाठविले जाणार आहेत. 'मागील 70 वर्षांपासून अमेरिका भारताच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे. कोरोना महामारीमध्येही अमेरिका भारतासोबत आहे. भारताने जशी सुरूवातीच्या काळात आम्हाला मदत केली. त्याप्रमाणे आता भारताला गरज असताना आम्हीही मदत करत आहोत,' असे प्रवक्त्याने सांगितले.

युएस एजन्सीकडून सुरूवातीला 23 मिलियन डॅालरची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवसांत 100 मिलियन डॅालरची मदत पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये 1100 रिफिएबल अॅाक्सीजन सिलिंडर, 1700 मेडिकल अॅाक्सीजन कॅान्सेन्ट्रेटर्स, अॅाक्सीजन जनरेशन युनिट, 15 लाख एन95 मास्क आदी साहित्याचा समावेश आहे.

#ResignModi ब्लॅाक; फेसबुकने केला खुलासा

देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत असून तीन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्णलयातील बेड, अॅाक्सीजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यावरून विरोधी पक्षांसह अनेकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. तसेच सोशल मीडियावर #ResignModi हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा मागणाऱ्या अनेक पोस्ट #ResignModi हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. कोरोना काळात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका अनेकांनी आपल्या पोस्टमध्ये ठेवला आहे. तसेच कोरोना वाढत असताना पंतप्रधान पाच राज्यांतील निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होते, अशा पोस्टही टाकल्या जात आहेत. 

या हॅशटॅगवरून आता वाद निर्माण झाला आहे. फेबबुकने अचानक या हॅशटॅगसह संबंधित काही पोस्ट ब्लॅाक केल्या. त्यावरून पुन्हा सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी फेसबुकला धारेवर धरले. केंद्र सरकारच्या सांगण्यावरूनच फेसबुकने हा हॅशटॅग हटविल्याची टीका होऊ लागली. या टीकेनंतर फेसबुकने पुन्हा काही तासांतच हा हॅशटॅग रिस्टोर केला. हा हॅशटॅग चुकून ब्लाॅक झाल्याचा खुलासा फेसबूकने केला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख