मोठा बेड घोटाळा : महापालिकेतील कर्मचारी घेतात बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच - Covid bed scam in bengaluru municipal corporation hospitals says MP tejasvi surya | Politics Marathi News - Sarkarnama

मोठा बेड घोटाळा : महापालिकेतील कर्मचारी घेतात बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 मे 2021

भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बेंगलुरू : भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये एका बेडसाठी तेथील कर्मचारी 25 ते 50 हजारांची लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कोरोना (Covid19) बेड घोटाळा (Bed Scam) भाजपच्याच (BJP) खासदारांनी  उघडकीस आणल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कोरोना रुग्ण वाढू लागल्याने रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. नातेवाईकांना अनेक तास चकरा मारून एखादा बेड उपलब्ध होत आहे. याचाच गैरफायदा घेतला जात आहे. बेंगलुरू महापालिकेच्या रुग्णालयांसाठी केंद्रीय बेड नोंदणी पध्दत ठेवण्यात आली आहे. यामध्येच घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी केला आहे. बेंगलुरू महापालिकेसह कर्नाटकातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे सुर्या यांच्या आरोपांची मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. 

हेही वाचा : अदर पूनावाला यांच्या जीवाला धोका! झेड प्लस सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात याचिका

सुर्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत आहे. त्यातून बेडसाठी गैरव्यवहार केले जात आहेत. कोरोनाबाधित पण घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नावाने काही बेड बुक केले जातात. त्यानंतर या बेडसाठी इतरांकडून 25 ते 50 हजार रुपयांची लाच घेतली जाते. चार हजारांहून अशा केस समोर आल्या आहेत. आरक्षित केलेल्या बेड पैसे न मिळाल्यानंतर खुल्या केल्या जात आहेत. हे बेड 12 तासांसाठी आरक्षित केल्या जात आहेत. त्यानंतर त्या लाच घेऊन दिल्या जात असल्याचे सुर्या यांनी सांगितले. 

सुर्या यांनी केलेल्या आरोपांनंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बेंगलुरू महापालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नेत्रावती व रोहित कुमार या दोघांना अटक केली आहे. बेंगलुरूमध्ये बेड आरक्षणासाठी हे दोघे एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, सुर्या यांनी आपल्याच सरकारचे पितळ उघडले पाडल्याबद्दल काँग्रेसने त्यांचे अभिनंदन केले आहे. 

काही आमदारांकडून महापालिका रुग्णालयातील एकुण बेडपैकी 15 टक्के बेड राखीव ठेवण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणत असल्याचे सुर्या यांच्या निदर्शनास आले होते. सरकारी रुग्णालयांमध्ये 150 व्हेंटिलेटर आणि खासगीमध्ये 400 व्हेंटिलेटर आहेत. तर दुसरीकडे दररोज 20 ते 25 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आमच्यावर खूप ताण येत असल्याचे एका सरकारी रुग्णालयातील डॅाक्टरांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख