पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीस बालेवाडी येथे सुरूवात.. 

मतमोजणीचा निकाल आज रात्री उशिरा किंवा उद्या (ता. ४) पहाटे जाहीर होण्याची शक्यता आहे.
02Pune_20Graduate_20Constituency.jpg
02Pune_20Graduate_20Constituency.jpg

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीस बालेवाडी येथे सुरूवात झाली आहे. उमेदवारांचे समर्थक मतदान केंद्राजवळ दाखल झाले आहेत. पुण्यासह पाचही जिल्ह्यात झालेले विक्रमी मतदान झाले आहे.  मतमोजणीचा अधिकृत निकाल आज रात्री उशिरा किंवा उद्या (ता. ४) पहाटे जाहीर होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा प्रथमच महाविकास आघाडीनं एकत्र निवडणुक लढविली आहे. भाजपच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.  या निवडणुकीत पसंतीक्रमाने मतदान करण्याची प्रक्रिया आणि पदवीधरसाठी ६२, तर शिक्षकसाठी ३५ उमेदवार रिंगणात असल्याने मतमोजणी करण्यासाठी किमान दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचा निकाल आज रात्री किंवा ४ डिसेंबरला प्रशासनाकडून अधिकृत जाहीर होणार आहे. पुणे विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका बालेवाडी येथे आणण्यात आल्या आहेत. सकाळी मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीर अंतराचे पालन करूनच ही प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मतमोजणीचे काम वाटून देण्यात आले आहे. यंदा दोन्ही मतदारसंघांमध्ये जास्त उमेदवार, कोरोनामुळे वाढवण्यात आलेली मतदान केंद्रे आणि उच्चांकी झालेले मतदान या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या प्रक्रियेस वेळ लागणार आहे.  

शिक्षक मतदारसंघामध्ये ३५ उमेदवार असल्याने तुलनेने कमी आकाराची मतपत्रिका होती. विभागात पदवीधर मतदारसंघासाठी १२०२ ; तर शिक्षक मतदारसंघासाठी ३६७ मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेसाठी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्‍म निरीक्षक यांच्‍यासह सात हजार ४१; तर शिक्षक मतदारसंघासाठी तीन हजार ११६ असे दहा हजार १५७ अधिकारी आणि कर्मचारी होते. तर दोन हजार ९१७ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली होती.  शिक्षक मतदार संघासाठी 42 टेबलावर मतमोजणी होईल. प्रत्येक फेरीत तेराशे मते मोजले जातील.

यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 1 लाख 53 हजार 171 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत विजयी होईल. तर ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 25 हजार 390 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत विजयी होणार आहे, अशी शक्यता पॅालिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो यांनी व्यक्त केली.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे मतदारांना मतदान करताना लक्ष विचलित करण्यात कारणीभूत ठरले असले तरी पदवीधर मतदार संघ निवडणूकीची मतमोजणी पद्धत क्लिष्ट असते. सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने त्याचा थेट फायदा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनाच होणार असल्याचे पॅालिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरोने केलेल्या अभ्यासात आढळले आहे.  

(Edited  by : Mangesh Mahale) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com