'स्पुटनिक' लशीची आधी निर्यात मगच भारतीयांना; उजाडणार मे महिना - Corona Vaccination Sputnik V doses ready for India market in May | Politics Marathi News - Sarkarnama

'स्पुटनिक' लशीची आधी निर्यात मगच भारतीयांना; उजाडणार मे महिना

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 एप्रिल 2021

औषध महानियंत्रकांनी आज लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली.

नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीला आज औषध महानियंत्रकांनी भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. पण ही लस प्रत्यक्षात मे किंवा जून महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते प्रमाणही तुलनेने कमी असेल. त्याआधी या लसीची बाहेरील देशांत निर्यात केली जाणार आहे. अमेरिका, युरोप, ब्रिटन, आफ्रिका, दक्षिण पूर्व आशियामधील काही देशांनी सुमारे 10 कोटी डोससाठी आधीच नोंदणी केलेली आहे.

रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीला देशात वापराची परवानगी देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मर्यादीत स्वरूपात या लशीचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या लशीला परवानगी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. ही लस 92 टक्के परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्पुटनिकचे उत्पादन देशातील पाच कंपन्यांकडून केले जाणार आहे.

भारतात दरवर्षी सुमारे 85 कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. पण रशियन सोवेरियन वेल्थ फंड (आरडीआयएफ) ने लशीच्या पुरवठ्यासाठी अनेक देशांशी करार केला आहे. जगात 59 देशांनी या लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. त्यामुळे त्या प्रत्येक देशात लशीचे वितरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भारतातील उत्पादनात वाढ केली जाणार असल्याचे स्पष्ट कऱण्यात आले आहे.

भारताला मे महिन्यात लशींचा पुरवठा सुरू होईल. पण हे प्रमाण कमी असेल. त्याआधी इतर देशांमध्ये लशींची निर्यात केली जाणार आहे. सुमारे 10 कोटी डोस सुरूवातीच्या टप्प्यात परदेशात पाठविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या वाट्याला अत्यंत कमी डोस येणार आहेत. भारतात दर महिन्याला पाच कोटींहून अधिक डोसचे उत्पादन केले जाईल. मे महिन्यापासून भारतात लस वितरीत केली जाईल, असे 'आरडीआयएफ'ने स्पष्ट केले आहे.

भारतात सध्या दोन लशींचा वापर

भारतात सध्या सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर सुरू आहे. मात्र, मागील काही दिवसांत लसीकरणाचा वेग वाढल्याने देशातील अनेक भागात लशीचा तुटवडा जाणवत आहे. अपेक्षित लस मिळत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. त्यातच आता स्पुटनिक लशीला परवानगी मिळाल्याने लशीच्या पुरवठ्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. मात्र, ही लस प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पुढील सात महिन्यात चार लशी

पुढील सात महिन्यांमध्ये देशात आणखी चार लशींना मान्यता मिळू शकते. त्यामध्ये जॅान्सन अँड जॅान्सन, सिरम इन्स्टिट्युट, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लशीचा समावेश आहे. यातील सिरम व बायोटेकची लस नाकावाटे देण्यात येणारी आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख