भयावह : जगात रोज आढळणाऱ्या प्रत्येक पाच कोरोना रुग्णांमध्ये एक भारतीय... - Corona Update India accounts for every fifth new case in the world | Politics Marathi News - Sarkarnama

भयावह : जगात रोज आढळणाऱ्या प्रत्येक पाच कोरोना रुग्णांमध्ये एक भारतीय...

वृत्तसंस्था
बुधवार, 14 एप्रिल 2021

देशातील रोजची कोरोना रुग्णांची वाढ आता जगाचाही चिंतेचा विषय बनला आहे.

नवी दिल्ली : देशातील रोजची कोरोना रुग्णांची वाढ आता जगाचाही चिंतेचा विषय बनला आहे. भारत देशातील रोजच्या रुग्णवाढीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. जगात दररोज आढळून येणाऱ्या प्रत्येक पाच कोरोनाबाधित रुग्णांमध्ये किमान एक भारतीय रुग्ण आहे. मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये ही परिस्थिती होती. आता भारताने ब्राझीललाही मागे टाकले आहे. 

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाबाधितांची संख्या जवळपास सव्वा तीन कोटींवर पोहचली आहे. दोन दिवसांपर्यंत अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक लागत होता. पण ता. 12 एप्रिलला भारताने ब्राझीलला मागे टाकले. ब्राझीलमध्ये 12 एप्रिलला 1 कोटी 35 लाख कोरोनाबाधित होते. तर भारतात हा आकडा 1 कोटी 36 लाखांच्या पुढे गेला आहे. मागील महिनाभरात भारतात वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे कमी कालावधीतच भारत जगातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला दुसरा देश ठरला आहे. 

भारताचा मृत्यू दर कमी

भारतात ता. 13 एप्रिल रोजी एकाच दिवशी 1 लाख 61 हजार 736 नवे रुग्ण आढळून आले. तर 879 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा 1 लाख 72 हजारावर गेला आहे. तर ब्राझीलमध्ये मृतांचा आकडा भारताच्या दुप्पट म्हणजे 3 लाख 50 हजारांवर गेला आहे. भारताचा मृत्यूदर या देशांच्या तुलनेत कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. 

संक्रमणाचा वेग अधिक

मागील आठवडाभरात भारतात दररोज सुमारे दीड लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर ब्राझीलमध्ये ही संख्या सुमारे पाऊण लाख आणि अमेरिकेत 70 हजार एवढी आहे. एका व्यक्तीपासून इतरांना संक्रमण होण्याचा भारताचा दरही (आर-व्हॅल्यु) अमेरिका व ब्राझीलच्या तुलनेत वाढला आहे. भारतात हा दर 1.45 तर अमेरिकेत 1.06 व ब्राझीलमध्ये 1.03 एवढा आहे. म्हणजे भारतात एक व्यक्ती किमान एक ते दोघांना संक्रमित करत आहे. 

भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही मान्य केले आहे. ''नवीन रुग्णसंख्येकडे पाहिले तर देशात यापूर्वीचा रोजच्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा आपण केव्हाच ओलांडला आहे. तसेच त्यात वाढ होतच चालली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे,'' असे त्यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख