कोरोना चाचणीच्या दरात कपात..  - corona test rate reduction | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना चाचणीच्या दरात कपात.. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे.

मुंबई : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य सरकारने सहाव्यांदा कपात केली आहे. 980 रुपयांऐवजी 780 हा दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली आहे.विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते. 

राजेश टोपे म्हणाले, "राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र सरकारच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 780 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य सरकारने कोरोना उपाययोजनांसदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन निर्णय घेतले. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या. ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझमा बॅगचे दर देखील निश्चित करण्यात आले. 

मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव जागृती देखील करण्यात आली.

राज्यात कोरोना काळात सर्व नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करुन लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळाली असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख