राजू शेट्टींनाही लक्षणे : माझ्यामुळे तुम्हाला संसर्ग झाला तर माझ्या मनावर ओझं - corona test negative for Raju Shetty but shows symptoms | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टींनाही लक्षणे : माझ्यामुळे तुम्हाला संसर्ग झाला तर माझ्या मनावर ओझं

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

काळजी घेण्याची शेट्टींचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने ते क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना मानसन्मान ठेवत नाही, असा इशाराही आपल्या कार्यकर्त्यांना दिला असून सुरक्षित राहण्यास बजावले आहे.

याबाबत त्यांनी सोशल मिडियावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की बरेच लोक माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येत असतात, मी विविध कारणांसाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात येऊन आपल्या परिवाराला धोक्यात न घालता, फोनवरुन चर्चा करा. मी उपलब्ध असेन. काल माझी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली, पण काल रात्रीपासून मला थोडा ताप येऊन अस्वथ वाटू लागले म्हणून मी डॉक्टर सतीश पाटील यांच्याकडे जाऊन HRCT टेस्ट केली.  त्यातून समजले की माझे फुफुस थोड्या प्रमाणात बाधीत झाले  आहे. ही कोरोना पॉझिटीव्हचीच लक्षणे आहेत. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घरी राहूनच उपचार घेत आहे. कोरोना मान-सन्मान ठेवत नाही तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, त्यामुळे माझ्या संपर्कात आल्याने आपण सुरक्षित राहाल, हा भ्रम मनातून काढून टाका. माझ्या संपर्कात आल्याने दुस-या कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला तर माझ्या मनावर त्याचं ओझं राहील , याची जाणीव ठेवून मी काही काळासाठी स्वत:ला घरी क्वारंटाईन करण्याचं ठरवलं आहे. कृपया आपणही मला या गोष्टीसाठी साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दूध दरवाढीसाठी शेट्टी यांनी राज्यात आंदोलन केले होते. बारामती येऊन त्यांनी सरकारला इशारा दिला होता. तसेच त्यांचे दौरेही सुरू होते. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना कोरोनाने गाठले असून क्रिडामंत्री सुनील केदार यांच्यावरही मुंबईत उपचार सुरू आहेत. बरेच खासदार आणि आमदार कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख