रेमडिसिवर इंजेक्शन मिळाले नाही तर कोरोना रुग्णाचा मृत्यू अटळ? - is Corona patient death inevitable if not received remdesivir injection | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

रेमडिसिवर इंजेक्शन मिळाले नाही तर कोरोना रुग्णाचा मृत्यू अटळ?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 एप्रिल 2021

या इंजेक्शनसाठी महाराष्ट्रात बिकट स्थिती

पुणे : महाराष्ट्रात सर्वत्र रेमडिसिवर इंजेक्शनसाठी हतबलता दिसून येत आहे. ते न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा धीर सुटत आहे. त्यातून त्याचा काळाबाजार आणि रुग्णांची आर्थिक फसवणूकही होत आहे. पण हे इंजेक्शन मिळाले नाही तर खरेच कोरोना रुग्णांना धोका आहे का, याचे उत्तर रुग्णांचे नातेवाईक शोधत नाहीत.

याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासामध्ये रेमडिसिवर कोविड-19 उपचारांमध्ये केवळ काही अंशी गुणकारी आहे असे दिसून आले आहे. त्यामुळे रेमीडीसिविर मिळाले की 100% बरे होणार आणि नाही मिळाले की मृत्यु अटळ अशी वस्तुस्थिती अजिबात नाही. परंतु ते मिळत नाही या हतबलतेमुळे मानसिक आघात होऊन बरेच जण खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या औषधाचा नेमका उपयोग कधी कसा व कितपत आहे हे सर्वांना समजणे आवश्यक आहे. सर्व डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना याबाबत वस्तुस्थिती अवगत करून देणे अभिप्रेत आहे, अशी अपेक्षा या निवेदनामध्ये व्यक्त केली आहे.

केवळ याच औषधामुळे रुग्णाचे प्राण वाचतात, हा गैरसमज असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. पण त्याच्या अट्टहासापोटी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा, त्यांचा संताप, प्रशासनावर ताण अशा अनेक बाबी घडून येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर आढावा घेण्यात आला आणि जिल्हानिहाय वितरण केंद्रे या इंजेक्शनसाठी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पुणे जिल्हाधिकारी यांनी, रेमडेसिविर साठी कंट्रोल रूमची स्थापना केली आहे. ज्यांना इंजेक्शन हवे असतील त्यांनी 020-26123371 किंवा 1077 (टोल-फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधावा. 11 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत ही कंट्रोल रूम कार्यान्वित राहील.

निर्यातीवर बंदी

रूग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच, देशात याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठीआता केंद्र सरकाने रेमडेसिवरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील 11 एप्रिल रोजी रुग्णांची संख्या

 दिवसभरात 6679 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात 4628  रुग्णांना डिस्चार्ज.

- करोनाबाधीत 48 रुग्णांचा मृत्यू. 10 रूग्ण पुण्याबाहेरील.

- 1045 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 329661

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 52476

- एकूण मृत्यू - 5748

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज - 271437

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 24773

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख