वादग्रस्त वक्तव्य अंगलट...मिलिंद एकबोटेंविरुद्ध गुन्हा दाखल

वादग्रस्त वक्तव्य करणे हे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या अंगलट आले आहे.
ekbote6.jpg
ekbote6.jpg

पिंपरी : "कोंढवा हे मिनी पाकिस्तान असून तेथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे," असे वादग्रस्त वक्तव्य करणे हे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या अंगलट आले आहे. या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल संभाजी ब्रिगेडने तक्रार केल्याने एकबोटेंविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात धार्मिक तेढ पसरवल्याच्या आरोपावरून काल गुन्हा दाखल करण्यात आला.

कोंढवा येथे हज हाऊस निर्माण करण्याच्या पूणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात एकबोटे यांनी २ मार्चला वरील वक्तव्य केले. ते जाणीवपूर्वक व हेतुपुरस्करपणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्यहानी आणि वित्तहानी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे ब्रिगेडचे म्हणणे आहे. लोकांना जमवून एकत्रित संघटित करून गैरमार्गाने बेकायदा राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे बेछूट बेताल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माची त्यांनी बदनामी केली आहे. 

दंगली घडवून दहशत माजविण्याचा हेतूने हेतूपुरस्सर सदरील भाषणाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावरही त्यांनी प्रसारित केले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी काल केली. त्यावर लगेचच पोलिसांनी कलम १५३, १५३अ, १५३ब, २९५अ, २९८, ५००, ५०१, ५०२, ५०५(१)(क), ५०५(२) व ३४ &  १२०ब  भारतीय दंड संहिता, १८६० &  कलम ६६अ व ६६ब  माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात तीन ते पाच वर्षे कारावास होऊ शकतो. 

कोंढव्यामध्ये हज हाऊस बनवण्याचे पुणे पालिकेने सुरु केलेले काम हे अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. या ठिकाणी अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. समस्त हिंदू आघाडी आपली ताकद पणाला लावून ते होऊ देणार नाही, असे एकबोटेंनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. तसे पत्रच त्यांनी पुणे पालिका आय़ुक्तांना दिले आहे.

त्यांचे हे वक्तव्य हिंदू-मुस्लीम एकोपा टिकविण्यास बाधक असून कोंढव्या नागरिकांची व कोंढव्याची बदनामी करणारे असल्याने त्याविरोधात फिर्याद दिल्याचे काळे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. या असामाजिक कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांचीही त्यांनी बदनामी केली असल्याचे ते म्हणाले. 

एकबोटेंविरुद्ध मोकान्वयेही कारवाईची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान,याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असल्याचे कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. दरम्यान, यासंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी एकबोटे यांना वारंवार फोन करूनही त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com