फडणवीस सरकार असताना RSS च्या किती लोकांना मंत्री दरबारी ठेवले..पटोलेंचा सवाल - Congress state president Nana Patole criticizes BJP leaders | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस सरकार असताना RSS च्या किती लोकांना मंत्री दरबारी ठेवले..पटोलेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मार्च 2021

भाजप नेत्यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

मुंबई :  भाजप नेत्यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. पटोले म्हणाले की महाराष्ट्रात विरोधी पक्ष चुकीच्या मार्गाने चालला आहे. जिलेटीन ज्या नागपूर विभागातून आले होते, हिरेनला कोणी मारले, या बाबत केंद्रीय तपास यंत्रणेने हे सर्व आपल्या हाती घेतले आहे, मग तपास यंत्रणा हे सर्व सांगत का नाही.अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातातील बाहुली बनू नये. महाराष्ट्राची बदनामी विरोधी पक्षाकडून वारांवर होत आहे, हे चुकीचे आहे. 

पटोले म्हणाले, "फडणवीस सरकारमध्येही असे प्रकार होत होते. आज मी मुख्यमंत्र्यांना भेटून या बाबत माहिती देणार आहे. आयपीएस, आयएस या अधिकाऱ्यांचा वापर कसा केला जातो, हे सर्वांना माहित आहे. आम्ही नेहमी सांगत आहोत की राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. राजभवन हे भाजप कार्यालय झाले आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. कालचे नावडते अधिकारी आज भाजपला आवडीचे झाले आहेत हे कसं काय ? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी काय बोलावे हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. फडणवीस सरकार असताना त्यांनी किती राजीनामे घेतले. आयपीएस अधिकाऱ्यांनी हे आरोप केले आहेत, ही गंभीर बाब आहे, पण याची चौकशी व्हायला हवी. फडणवीस सरकार असताना आरएसएसच्या किती लोकांना मंत्री दरबारी ठेवले होते. त्याची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत."  

देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे
पटोले म्हणाले, "वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती  असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात होता, याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत.

पोलिस बदल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार पटोले यांनी घेतला. ते म्हणाले की, फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपाने आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे. फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात.

माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपावाले टीका करत होते, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत याची आम्हाला माहिती आहे. खा. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली त्याचा एफआयआर दाखल करण्यातही परमवीरसिंह यांनी टाळाटाळ केली. त्यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. सध्या सुरु असलेल्या प्रकरणाची हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे, असे पटोले म्हणाले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील,  आ. संग्राम थोपटे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख