"मतभेद दूर करा.." बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Congress State President Balasaheb Thorat appealed to all to come together by overcoming their differences.  | Politics Marathi News - Sarkarnama

"मतभेद दूर करा.." बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

चेतन देशमुख
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

यवतमाळ हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे गत वैभव मिळवुन देण्यासाठी सर्वांनी मतभेद दूर करून एकजुटता दाखवावी," असे आवाहन  बाळासाहेब थोरात यांनी  केले.

यवतमाळ : "यवतमाळ हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे गत वैभव मिळवुन देण्यासाठी सर्वांनी मतभेद दूर करून एकजुटता दाखवावी," असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे केले. आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष बांधणी करावी, असेही ते म्हणाले. 

येथील वादाफळे पॅलेसमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते काल बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार, नितीन कुंबलकर, आशिष दुआ, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, सचिन नाईक, वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष वझाहत मिर्झा, सध्या सव्वालाखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते. 

थोरात म्हणाले की, काँग्रेच भवनाच्या जागेकरीता माणिकराव ठाकरे यांनी प्रयत्न केले. त्यासोबतच जिल्ह्यातील इतरही नेत्यांनी पाठपुरावा केल्याने भव्यदिव्य वास्तू यवतमाळात उभारण्यात येणार आहे. याचाच कित्ता राज्यभरा राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात काँग्रेस भवन उभारण्यात येईल, अशी ग्वाही महसुल मंत्री थोरात यांनी दिली. येणार्‍या काळात नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुका आहे. ह्यात एकजूटता दाखविल्यास आपल्याला यश नक्कीच मिळेल, असेही थोरात म्हणाले. 

कोरोनाच्या काळात कर्जमाफीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी अतिशय चुकीची होती. मात्र, महाविकास आघाडीने कुठल्याही अडथळाविना शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, खासदार बाळू धानोरकर, माजीमंत्री माणिकराव ठाकरे, आशिष दुआ आदींनी विचार व्यक्त केले.

संबंधित लेख