कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी उद्या काँग्रेस रस्त्यावर उतरणार  - Congress to rally tomorrow to oppose agriculture bill | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी उद्या काँग्रेस रस्त्यावर उतरणार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

राज्यातील सहा ठिकाणांहून एकाचवेळी काँग्रेसचे नेते शेतक-यांशी संवाद साधणार आहेत 

पुणे : कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी उद्या (ता.15) कॉंग्रेसची ‘शेतकरी बचाव रॅली’ काढण्यात येणार आहे. राज्यात संगमनेर (जिल्हा नगर), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकणात एक, अशा सहा ठिकाणांहून स्वतंत्र रॅली काढण्यात येणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितले.

राज्यातील सहा ठिकाणांहून एकाचवेळी  काँग्रेसचे नेते शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.  या रॅलीत दहा हजार गावांतील शेतकरी सहभागी होणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

संगमनेरची रॅली काँग्रेसचे महाराष्ट्र  प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार  राजीव सातव यांच्या कोल्हापूर येथील रॅली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या, औरंगाबाद येथील रॅली वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या, अमरावती येथील  रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या, नागपूरमधील रॅली ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत , पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या तर, कोकण विभागातील रॅली प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.

थोरात म्हणाले की हे तीनही नवे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आहेत. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या काळ्या कायद्याविरोधात राज्यभरात  रस्त्यावर उतरून  काँग्रेसच्यावतीने संघर्ष करण्यात येणार आहे. केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी आणि कामगार कायदे आणून नरेंद्र मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ आणि या विधेयकांच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध करण्यासाठी कॅाग्रेसच्यावतीने ही रॅली काढण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख