खूप राग येतोय अन् दु:खही! पंतप्रधान मोदींवर सोनिया गांधी भडकल्या... - Congress President Sonia Gandhi slams PM Modi over corona situation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

खूप राग येतोय अन् दु:खही! पंतप्रधान मोदींवर सोनिया गांधी भडकल्या...

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

संकटकाळातही मोदी सरकारचे निर्णय मनमानी आणि पक्षपातीपणाचे असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. रुग्णांना बेड, अॅाक्सीजन मिळत नाही. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. जवळपास अडीच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. यावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारला चांगलेच धारेवर धरले. मोदी सरकार कोरोना संकट हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. 

सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या स्थितीवर परखडपणे आपली भूमिका मांडली. लोकांनी एकत्रित येऊन सरकारला पारदर्शकता आणि जबाबदारीचे भान करून द्यायला हवे. लोकांच्या जीवापेक्षा दुसरे काहीच महत्वाचे नाही. सध्याचे नेतृत्वाचे दुर्लक्ष धक्कादायक आणि बेजबाबदारपणाचे आहे. विरोधी पक्ष म्हणून लोकांचे म्हणणे ऐकून घेत ते सरकारपर्यंत पोहचविणे हे आमचे काम आहे. आतातरी सरकारने जबाबदारी घेत काम करावे, यासाठी आम्ही दबाव टाकत राहू. आताही वेळ गेलेली नाही. वेळेत पावले टाकल्यास लाखो लोकांचे जीव वाचू शकतात, अशी अपेक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.

मोदी सरकारचे निर्णय मनमानी अन् पक्षपाती

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे पाहण्याचा मोदी सरकारचा दृष्टीकोन अत्यंत आपत्तीजनक असाच आहे. अक्षम्य दुर्लक्ष तर आहेच पण लोकांना दुर लोटलं जात आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना योग्यप्रकारे नियोजन करण्याऐवजी सगळे लक्ष केवळ विधानसभा निवडणूकांवर होते. आताचेही त्यांचे निर्णय मनमानी आणि पक्षपातीपणाचे आहेत. तसेच दुटप्पीपणा केला जात अाहे. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांची आता कसलीही तयारी किंवा धोरण नसल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.

खूप राग येतोय अन् दु:खही 

सरकार प्रत्येक टप्प्यावर अपयशी ठरले आहे. राजकीय विरोधक असलो तरी आमच्या मनात कसलीही सुडाची भावना नाही. मला खूप दु:ख होतंय आणि त्यांनी काहीच न केल्याचा रागही येतोय. आपण या स्थितीत आलोय, ही शोकांतिका आहे. त्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम नीट न ठरविल्याने लोकांचे जीव जात असल्याची खंतही सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. 

आता अॅाक्सीजनची आयात करण्याची वेळ

केंद्र सरकारने केलेल्या सिरो सर्व्हेमध्येच दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. संसदीय समितीसह काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनीही तयारीबाबत सतत विचारणा केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले. उलट आम्ही भीती पसरवत असल्याची टीका करण्यात आली. कोणत्याही नवीन सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. बेड, औषधांची उपलब्धता केली नाही. सर्वाधिक अॅाक्सीजन उत्पादन होणाऱ्या देशांमध्ये भारत आहे, हे विसरू नये. आपण दररोज 7 हजार 500 मेट्रीक टन उत्पादन करतो. तरीही अॅाक्सीजन तुटवडा कसा जाणवत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हा लढा आपण सर्व विरूध्द कोरोना...

कोरोना विषाणू सर्वत्र आहे. मागील वर्षभर काँग्रेस पक्षाने सरकारला सर्वप्रकारचे सहकार्य केले आहे. कोरोनाविरूध्दचा हा लढा तुम्ही विरूद्ध आम्ही असा नाही तर आपण सर्व विरूद्ध असा आहे. ही लढाई राजकीय हेवेदाव्यांच्या पलीकडची आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्याला एकजुटीने ही लढाई लढावी लागेल. ही लढाई काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांविरोधात नसून कोरोनाविरूद्ध आहे, हे मोदी सरकारने जाणून घ्यावे, अशी अपेक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. 

लसीकरण धोरण भेदभावजनक 

जगात कोणत्याही देशामध्ये भारताप्रमाणे असंवेदनशील व भेदभावजनक लसीकरण धोरण नाही. एकाच देशात दोन लस उत्पादकांच्या लशींच्या पाच वेगवेगळ्या किंमती आहेत. त्यावर सरकार गप्प कसे राहू शकते? त्यामुळे सध्याच्या महामारीच्या काळात सरकार नफेखोरीला बळ देत असल्याच्या आरोपाला अधिक खतपाणीच मिळेल. नवी लस धोरणानुसार आपल्याच देशातील नागिरकांना निर्यात केलेल्या लशींपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे. हे न्यायाला धरून नाही. सरकारने सर्व नागरिकांना मोफत लस द्यायला हवी. नागरिकांमध्ये वयानुसार भेदभाव करू नये. लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे. 

आपत्ती व्यवस्थापनाचा काँग्रेसला खूप अनुभव

काँग्रेसला अनेक वर्षांचा सरकार व आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव आहे. त्यामुळं आम्ही नेहमीच मदतीला सज्ज आहोत. पण एकत्रितपणे काम करण्याऐवजी विरोधकांनी दिलेल्या सुचनांवर टीका केली जाते. इतर पक्षांच्या राज्यांच्या स्थितीकडे बोट दाखविले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या अनेक गोष्टींकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. प्राधान्याने अॅाक्सीजन पुरवठा सुरळीत करायला हवा. संसदीय समितीने नोव्हेंबर 2020 मध्येच अॅाक्सीजनबाबत सुचित केले होते. पण सरकारने त्यावर काहीच पावले टाकली नाहीत. बेडची उपलब्धता आणि चाचण्यांचे प्रमाणही सध्या वाढविण्याची गरज आहे. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख