सोनिया गांधीनी पंतप्रधान मोदींकडे केल्या तीन महत्वाच्या मागण्या... - Congress President Sonia Gandhi has written a letter to PM Modi | Politics Marathi News - Sarkarnama

सोनिया गांधीनी पंतप्रधान मोदींकडे केल्या तीन महत्वाच्या मागण्या...

वृत्तसंस्था
सोमवार, 12 एप्रिल 2021

पात्र नागरिकांच्या खात्यात तातडीने सहा हजार रुपये जमा करावेत, ही महत्वाची मागणी सोनिया गांधींनी केली आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज रुग्णसंख्येचे विक्रमी आकडे समोर येत आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविले आहे. त्यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांकडे तीन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. 

सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री व मंत्र्यांशी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली आहे. त्यानुसार तीन महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधत असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. यापूर्वीही त्यांनी कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधानांना पत्र लिहून विविध मुद्दे मांडले होते. 

गरीबांच्या खात्यात सहा हजार जमा करा

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण अनेक ठिकाणी संचारबंदी, वाहतुकीवर मर्यादा, लॅाकडाऊन असे पर्याय वापरत आहोत. त्यामुळे आर्थिक उलाढालीवरही बंधने येतील. त्याचा फटका आधीच खचलेल्या लोकांवर होईल. प्रामुख्याने गरीब, रोजंदारीवरील लोकांना त्याचा फटका बसेल. त्यामुळे सध्या अत्यंत गरजेची असलेली किमान मासिक हमी उत्पन्न योजना लागू करावी. त्याअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकांच्या खात्यात तातडीने सहा हजार रुपये जमा करावेत. त्याचप्रमाणे कामगारांनी स्थलांतर सुरू केले आहे. त्यांची सुरक्षितपणे वाहतुक करण्याचे आव्हान आहे. तसेच त्यांचे योग्यप्रकारे पुनवर्सन करण्याचीही गरज असल्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना केले आहे. 

लशींसाठी वयाचे बंधन नको

कोरोनापासून बचावासाठी लस ही आपली आशा आहे. पण अनेक राज्यांमध्ये केवळ 3 ते 5 दिवस पुरेल एवढाचा साठा आहे. त्यामुळे लशींच्या उत्पादनाची देशातील क्षमता वाढविण्याची गरज आहे. तसेच आपत्कालीन वापरासाठी प्रस्ताव आलेल्या लशींना कोणत्याही विलंबाशिवाय परवानगी द्यावी. केवळ वय हे बंधन न ठेवता गरज व अधिक संसर्गाची शक्यता धरून संबंधितांना तातडीने लस द्यायला हवी. संबंधित राज्यातील संसर्गाचे प्रमाण विचारात घेऊन त्यांना लस देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

वैद्यकीय उपकरणे जीएएसटी मुक्त 

कोरोना महामारीशी लढण्यासाठी आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय उपकरणे, साधने, औषधे व सुविधांना जीएसटीमधून पुर्णपणे वगळावे. तसेच व्हेंटिलेटर, अॅाक्सीमीटर आणि अॅक्सीजन सिलिंडर यांनाही जीएसटीतून वगळायला हवे, अशा महत्वाची मागणीही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना केली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख