जानकरांच्या कार्यकर्त्यांच्या लग्नात नाना पटोले, थोरात, पृथ्वीराज, अशोकराव व-हाडी! - Congress leaders attend marriage ceremony at Mahabaleshwar | Politics Marathi News - Sarkarnama

जानकरांच्या कार्यकर्त्यांच्या लग्नात नाना पटोले, थोरात, पृथ्वीराज, अशोकराव व-हाडी!

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

काॅंग्रेस पक्षात घडामोडी आधी लग्नाच्या निमित्ताने सर्व प्रमुख नेते एकत्र 

महाबळेश्वर : काॅंग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा बसविण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे राज्यातील जवळपास सर्वच वरिष्ठ नेते एका लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी पायल व पुणे जिल्ह्यातील मुळशीचे माजी आमदार शरद ढमाले यांचे पुतणे व निवृत्त सहायक पोलिस उपायुक्त प्रभाकर ढमाले यांचा मुलगा अनिकेत यांच्या लग्नाच्या निमित्ताने हे सर्वजण एकत्र आले होते.  महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.

काँग्रेसचे वरीष्ठ नेते व विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या लग्नाला आवर्जून आले होते. तर माजी राज्यमंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, पोलिस खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्याचे नियम पाळत हा लग्न सोहळा संपन्न झाला. या लग्न समारंभाला मोजके नातेवाईक, मित्र परिवार यांची उपस्थिती होती. या निमित्ताने महादेव जानकर व काॅंग्रेस नेत्यांचा गप्पांचा फडही जमला. 

बाळासाहेब थोरात यांनी वऱ्हाडी मंडळींचे स्वागत करताना म्हणाले की जगताप व ढमाले या दोन्ही परिवाराचे सामाजिक व जिव्हाळ्याचे नाते आहे. माजी आमदार व रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप परिवाराचे चांगले काम केले. त्यानी पक्षात आणि मतदारसंघात चांगले काम केले. त्यांचे भविष्य उज्वल आहे. माजी आमदार शरद ढमाले हे दुसऱ्या पक्षात असले तरी या शरद ढमाले यांनी योग्य विचार करावा. नवरदेव अनिकेत याने जरी जानकर यांची लोकसभेची निवडणूक सांभाळली होती. आता अनिकेत हे आता या आमचे जावई होणार असल्याने आता आमच्या निवडणुकीची धुरा सांभाळणार आहेत, अशी राजकीय टोलेबाजी केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोघांना आशिर्वाद देताना म्हणाले, "जगताप परिवाराला प्रदीर्घ अशी सामाजिक परंपरा आहे. त्यांचे संघर्षमय जीवन होते. महाड परिसरातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. ढमाले परिवाराने देखील संघर्षमय जीवनातून प्रगती साधली आहे. माजी आमदार शरद ढमाले यांचा पक्ष वेगळा असला तरी तो परिवार देखील प्रतिष्ठित आहे. ढमाले व जानकर यांचे कौटुंबिक संबध आहे. पायल व अनिकेत याचे वैवाहिक जीवन मंगलमय होवो."

बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर लग्न सोहळ्यानंतर `सरकारनामा`शी थोरात म्हणाले की आजकाल साऱ्या गोष्टी पत्रकारच ठरवत असल्याचे सांगत त्यावरील अधिक भाष्य टाळले. येथूनच नाना पटोले हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी थेट मुंबईत आले. पटोले यांच्या नावाची काॅंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात केली आहे. त्यासाठी त्यांनी सायंकाळी पाच वाजता विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदी कोण येणार, याची आता उत्सुकता राहणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा विवाहसोहळा शेवटचा कार्यक्रम ठरला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख