प्रतिकात्मक कुंभमेळा, सभेतील गर्दी पाहून भावुक अन् कोरोनाचा आढावा... - Congress leader Nitin raut criticise PM narendra Modi over rallies in west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

प्रतिकात्मक कुंभमेळा, सभेतील गर्दी पाहून भावुक अन् कोरोनाचा आढावा...

वृत्तसंस्था
रविवार, 18 एप्रिल 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : देशात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक एकत्र आले आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्येही प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनेकांनी त्यावर टीकाही केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचे आवाहन आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांना केल्याची माहिती ट्विटरवरून दिली. या संकटाशी लढण्यासाठी ताकद मिळेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यानंतर बंगालमध्ये त्यांच्या दोन प्रचार सभा झाल्या. प्रचार सभेला झालेली गर्दी पाहून ते थोढे भावुकही झाले. या गर्दीचे त्यांनी कौतुकही केले. लोकसभा निवडणुकीवेळी घेतलेल्या सभेपेक्षा चारपटीने गर्दी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सभांचे व्हिडिओही ट्विट करण्यात आले आहेत. 

बंगालच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा आढावा घेतला. औषधे, अॅाक्सीजन, व्हेंटिलेटर्स, आणि लसीकरणावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. तसेच मागील वर्षाप्रमाणेच आणि कोरोनाशी त्याहून अधिक वेगाने यशस्वीपणे लढाई जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसचे नेते व उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. त्यांनी काल दिवसभराचे पंतप्रधानांच्या तीन ट्विटचा आधार घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आता लवकरच हे पुन्हा सभा घेतील, असे राऊत यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान सभेला झालेली गर्दी पाहून भावूक होतात, त्यांना महामारी वाढण्याची कसलीच चिंता नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 

दरम्यान, काँग्रेसकडून कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारला कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच आता राहुल गांधी यांनी बंगालमधील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्याची घोषणा आज केली. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन या सभा रद्द केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सध्याच्या परिस्थिती मोठ्या सभा न घेण्याचे आवाहनही त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांना केले आहे. 

बंगालमधील प्रचार सभा व रोड शोला होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणुकीतील पुढील टप्प्यांतील मतदान एकाच दिवशी घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे. पण त्यावर आयोगाकडून असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून निवडणुकीमुळे कोरोना वाढत नसल्याचा दावा आयोगाकडे केला आहे. ठरलेल्या तारखांनाच मतदान घेण्यात यावे, असे पत्र भाजपकडून आयोगाला देण्यात आले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख