ज्यांनी अपमान केला त्यांच्यासाठी चहा घेऊन जाणारे हरिवंशसिंह मोठ्या मनाचे, मोदींकडून अभिनंदन  - Congratulations from Harivansh Singh, who carried tea for those who insulted him | Politics Marathi News - Sarkarnama

ज्यांनी अपमान केला त्यांच्यासाठी चहा घेऊन जाणारे हरिवंशसिंह मोठ्या मनाचे, मोदींकडून अभिनंदन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कृषि विधेयकावरून राज्यसभेत निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी दिल्लीतील गांधी पुतळ्याजवळ कालपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नवी दिल्ली : " राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंशजी यांच्यावर ज्यांनी वैयक्तिक टीका करण्याबरोबर अपमान केला. तेच लोक धरणे आंदोलन करीत आहेत. तरीही हरिवंशजी यांनी मोठे मन दाखवून आणि विनम्रपणे आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी स्वत: चहा-नाष्टा घेऊन गेले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. लोक त्यांचे जसे अभिनंदन करीत आहे तसे मी ही त्यांचे अभिनंदन करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

कृषि विधेयकावरून राज्यसभेत निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी दिल्लीतील गांधी पुतळ्याजवळ कालपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन करणाऱ्या या सदस्यांसाठी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंशसिंह स्वत: आज सकाळी चहा आणि नाष्टा घेऊन आले होते. 

कृषी विषयक विधेयक मंजुरीच्या वेळी राज्यसभेत गोंधळ घातल्या बद्दल आठ सदस्यांचे एका आठवड्यासाठी निलंबन करण्यात आले आहे. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक , शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार व कृषि सेवा विधेयक ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला होता. 

अध्यक्षांसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजीव सातव, के. के. रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सैयद नाझीर हुसेन व एलामारन करी अशी या सदस्यांची नांवे आहेत. 

कृषी विधेयकांना विरोध करीत विरोधकांनी उपसभापतींसमोरील हौद्यात आणि सभागृहात ठाण मांडले होते. विरोधी सदस्यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी काही सदस्यांनी उपसभापतींसमोर हौद्यात जाऊन रूलबुक फाडले. या गोंधळाकडे पंतप्रधान मोदी यांनी आज पुन्हा ट्‌विट करून लक्ष वेधले आहे. उपसभापती हरिवंशसिंह यांचा अपमान केला, वैयक्तिक टीका केली तरीही अशीच मंडळी आंदोलन करीत आहेत. त्यांच्यासाठी मोठे मन दाखवून चहानाष्टा घेऊन जातात. त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो असे मोदी यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख