डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करू : धनंजय मुंडे - complet the work of Babasaheb Ambedkar Memorial by April 2023 Dhananjay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करू : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 डिसेंबर 2020

१४ एप्रिल २०२३ ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू," असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

मुंबई : "इंदूमिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच १४ एप्रिल २०२३ ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू," असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेत मुंडे बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुपाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, आमच्या पुढील अनेक पिढ्यांना ही शिकवण प्रेरणा देत राहील; असेही मुंडे म्हणाले. 

राज्य सरकार व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम विविध माध्यमातून बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी लाईव्ह दाखवत दादर येथील चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. देशभरातील लाखो अनुयायांनी शिस्त पाळत याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व अनुयायांचे आभार यावेळी धनंजय मुंडे यांनी मानले.

शासकीय कार्यक्रमानंतर लगेचच दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती स्थळी अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे हे सोबत उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी पवार यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख