गांजा, चरस घेणं गुन्हा नाही, असं म्हणणाऱ्या जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार    - Complaint to NCB for action against lyricist Javed Akhtar | Politics Marathi News - Sarkarnama

गांजा, चरस घेणं गुन्हा नाही, असं म्हणणाऱ्या जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार   

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

जावेद अख्तर यांच्याविरुध्द बारामतीचे अँड. भार्गव सुधीर पाटसकर यांनी अंमली पदार्थ विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

बारामती : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्वच अभिनेत्रींनी ड्रग्जसंदर्भात चॅट केल्याची कबुली एनसीबीसमोर दिली आहे. त्यांचे मोबाईलही एनसीबीने जप्त केले आहेत. 

आता सुप्रसिध्द गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांच्याविरुध्द बारामतीचे अँड. भार्गव सुधीर पाटसकर यांनी अंमली पदार्थ विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी गांजा, चरस यांचे सेवन करणे हा काही गुन्हा नाही, अशा स्वरुपाचे वक्तव्य केल होतं.  

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन दररोज नवीन खुलासे आणि बाबी समोर येत असतानाच आता गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांच्याविरुध्द अंमली पदार्थ विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. गांजा, चरस यांचे सेवन करणे हा काही गुन्हा नाही, अशा स्वरुपाचे वक्तव्य जावेद अख्तर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

एनडीपीएस कायद्यान्वये गांजा, चरस यांचे सेवन करणे कलम 27 नुसार अपराध आहे. अशा चुकीच्या वक्तव्यांमुळे अख्तर यांच्यासारख्या एका दिग्गजाने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे, एक प्रकारे गांजा व चरस यांचे सेवन करण्यास प्रवृत्त करणारे त्यांचे विधान असून या बाबत त्यांच्यावर कारवाईची मागणी अँड. पाटसकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. 

सुशांतसिंह राजपूत यांची मैत्रिण रिया चक्रवर्ती प्रकरणात या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अख्तर यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या बाबतचे पुरावेही पाटसकर यांनी या तक्रारीसोबत दिलेले आहेत. सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी ड्रग्ज प्रकरणात अडचणीत आले असून चौकशीला त्यांना सामोरे जावे लागते आहे. 

अशातच आता जावेद अख्तर यांनीही हे वक्तव्य करुन नवीन वादास तोंड फोडल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटणार हे निश्चित होते. आता अंमली पदार्थ विरोधी विभाग या तक्रारीची नेमकी कशी दखल घेणार या बाबत उत्सुकता आहे.

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत.

आपल्या देशात सेलिब्रेटींच्या प्रत्येक वाक्याला महत्व असते. एक सेलिब्रेटी गांजा व चरस घेणे गुन्हा नाही असे वक्तव्य करु लागला तर त्याचा समाजावर विपरीत परिणाम होईल, त्या मुळे अशा सेलिब्रेटींवर कारवाई होणे गरजेचे आहे, या उद्देशानेच ही तक्रार दाखल केलेली आहे.

अँड. भार्गव पाटसकर, बारामती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख