दिलासादायक : कोरोना चाचणीदरात कपात; आता 980 रुपयांत तपासणी  - Comfortable: Corona test rate cuts; Now check at Rs 980 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दिलासादायक : कोरोना चाचणीदरात कपात; आता 980 रुपयांत तपासणी 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

प्रति तपासणी दर सुमारे 200 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

मुंबई : राज्य सरकारने कोरोना चाचणी दरात चौथ्यांदा कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय सोमवारी घेतला आहे. त्यानुसार आता फक्त 980 रुपयांत खासगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी करता येणार आहे, याबाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

टोपे यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दरात सरकारकडून पुन्हा कपात करण्यात आली आहे. प्रति तपासणी दर सुमारे 200 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्‍चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिकचा दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. सुमारे 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत चाचणीचे दर कमी करून सरकारने जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे टोपे यांनी सांगितले. 

कोरोना चाचण्यांचे दर निश्‍चित करताना तीन टप्पे करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करून तपासणी करण्यासाठी 1400 रुपये, तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्‍चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य सरकारने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख