"हेलिकॉप्टरमधून नव्हे, जमिनीवरुन पाहणी करणार.."मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला.. - CM Uddhav Thackeray Taunt PM Narendra Modi On tauktae cyclone | Politics Marathi News - Sarkarnama

"हेलिकॉप्टरमधून नव्हे, जमिनीवरुन पाहणी करणार.."मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 मे 2021

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

रत्नागिरी  :  रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देत आहेत. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावा घेत आहेत. 
CM Uddhav Thackeray Taunt PM Narendra Modi On tauktae cyclone affected district visit

उद्धव ठाकरे यांनी आज तौते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मालवण व वेंगुर्ला येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. "कोकण आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  “मी हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार,” असाटोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. 

"येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही," असे ठाकरे म्हणाले.
 
कोट्यवधी रुपयांचे नुकसान
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. किनारी भागातील मच्छिमार बांधव आणि हापूस व काजू बागायतीचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचे देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. काही भागांमध्ये आजही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर किनारी भागामध्ये अनेक गोड्या पाण्याच्या विहिरीमध्ये समुद्राचे खारे पाणी गेल्याने या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांच्या समोर स्थानिक मच्छीमार नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सरकारने आपल्याला भरघोस मदत करावी, अशी मागणी केली आहे.

5,901 घरांची पडझड.. 20 घरे  जमीनदोस्त

जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत . जिल्ह्यात 5,901 घरांची अंशतः पडझड झाली आहे तर 20 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत . यामुळे 10 कोटींचे नुकसान झाले आहे . मच्छिमारांचे 2 कोटी , जिल्हा परिषद शाळा तसेच आरोग्यकेंद्र इमारतींचे 10 कोटी , शेतकऱ्यांचे 10 कोटी, वीज महावितरणचे 40 कोटी असे मिळून जिल्ह्यात एकूण 72 कोटींचे नुकसान झाले आहे .  
 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख