मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत : 12 एप्रिलपासूनच व्यवहार ठप्प करण्याचे सूतोवाच - CM Uddhav Thackeray prepares to implement total lock down from Apr 12 | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत : 12 एप्रिलपासूनच व्यवहार ठप्प करण्याचे सूतोवाच

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

थोडी सूट, थोडे निर्बंध उपयोगी नसल्याचे म्हणणे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असून येत्या सोमवारपासून राज्यात 15 दिवसांचा कडक लाॅकडाऊन लागण्याचे सूतोवाच त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत बोलताना केले. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणेच्या तयारीला प्रशासन लागले आहे. कडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. उद्या टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेतला.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती  प्रारंभी दिली. त्यानंतर ठाकरे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत लाॅकडाऊन कसा गरजेचा आहे, हे विषद केले.

मुख्यमंत्र्यांच्या मतानुसार  कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. राज्यातील क्षणाक्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.

कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल, असा इशारा त्यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख