परमबीर सिंग बदली ; आघाडीतील तिढा आज सुटणार का? - cm uddhav thackeray meet parambir singh and anil deshmukh discussion on sachin vaze case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

परमबीर सिंग बदली ; आघाडीतील तिढा आज सुटणार का?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची चैाकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री दीर्घकाळ बैठक सुरू होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आज सकाळी दहा वाजता पून्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीत पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

काल मध्यरात्री 12 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचीही वाझे प्रकरणावर मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी रात्री फोनवरून चर्चा केली. त्यामुळे आज मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहेत. 

उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटके धमकी प्रकरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणात अनेक गंभीर चुका एनआयएच्या चौकशीतून पुढे येत आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तांवर याचे खापर फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची महत्वाच्या मंत्री आणि नेत्यांसोबतच्या गेले दोन दिवस महत्वाच्या बैठका सुरू आहेत.  

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, असे त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेले आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या जबाबदारपदावर काम केलेले आहेत. त्यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी," असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख