मुख्यमंत्री म्हणाले, "पुन्हा लॅाकडाउनची परिस्थिती आणू नका.." - The CM said Don bring back the lockdown situation | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणाले, "पुन्हा लॅाकडाउनची परिस्थिती आणू नका.."

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

कोरोना रोखण्यासाठी नियमावली पाळा, अन्यथा पुन्हा लॅाकडाउन करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. 

मुंबई  : राज्यात कोरोना हातपाय पसरवित आहे. त्याला थांबविण्याची गरज आहे. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोनाशी मुकाबला केला पाहिजे. 'माझे कुंटुब माझी जबाबदारी' मोहीमेला काही जण अल्पप्रतिसाद देत आहेत. कोरोना रोखण्यासाठी नियमावली पाळा, अन्यथा पुन्हा लॅाकडाउन करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. 

कोरोनच्या रूग्णांची संख्या कमी होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही, असं कोणी समजू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्हाला मास्क हवा की पुन्हा लॅाकडाउन, असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला विचारला. ते म्हणाले की राज्यात सुमारे 15 लाख जण कोरोना बाधित होते, त्यातील सुमारे 12 लाख जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुदैवाने 40 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुमारे 2 लाख जण व्हेटिंलेटरवर आहेत. 

70 ते 80 टक्के जणांना सैाम्य, मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. कोरोनाशी लढणारे आरोग्य सेवक, महसुल विभाग, पोलिस यंत्रणा यांच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी कैातुक केले. कोरोनाकाळात शिवभोजन थाळीचा लाभ 2 कोटी 2 लाख जणांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

कृषी कायद्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की कृषी कायद्यातील फायदे-तोटे जाणून घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. कृषी कायदा जर शेतकऱ्यांचा हिताचा नसेल तर तो स्वीकारणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पावसामुळे शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल. लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच जीम सुरू करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा : मेट्रो कारशेड आता कांजूरला होणार 
  
मुंबई : मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द केली असून आता कांजूर येथे ही कारशेड होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गोरेगाव येथील आरेची जागा मेट्रोच्या कारशेडसाठी देण्याचा निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला होता. या कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली होती. त्याला पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. शिवसेना व सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या आंदोलनात उतरले होते. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली. 

 मुख्यमंत्री म्हणाले, '' आरे कार शेडचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही विरोध केला. अनेक पर्यावरणवादी ज्यांचे जीवसृष्टीवर प्रेम आहे. रातोरात झाडे कापली गेली. सत्याग्रहींवर गुन्हे दाखल झाले. त्यांचे सर्व गुन्हे सरकार मागे घेते आहे. आरेमध्ये जवळपास सहाशे एकरची जागा जंगल घोषीत केले आहे. तेथील आदिवासी पाडे, तबेले कुणाच्याही अधिकारांवर गदा येऊ न देता घोषीत केले. या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे,'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख