निवडणूक आयोगाची प्रचारबंदी अन् ममतांची 'गांधीगिरी'; उचलले हे पाऊल...

महत्वाच्या टप्प्यावर ममतांना एक दिवस प्रचारापासून दूर राहावे लागणार आहे.
CM Mamta Banerjee protest against the Election Commission
CM Mamta Banerjee protest against the Election Commission

कोलकाता : प्रचारसभेतील वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चांगलेच भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 24 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना या महत्वाच्या टप्प्यावर एक दिवस प्रचारापासून दूर राहावे लागणार आहे. मात्र, या निर्णयाचा विरोध गांधीगिरी पध्दतीने करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

प्रचारसभेमध्ये ममतांनी मुस्लिमांच्या मतदानासंदर्भात वक्तव्य केले होते. तसेच सीआरपीएफविरोधात विद्रोह करण्याचे आवाहन लोकांना केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानुसार निवडणूक आरोगाने ममतांना नोटीस बजावली होती. आज आयोगाने ममतांवर कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार ता. 12 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून ता. 13 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अशी 24 तास ममतांना प्रचारास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ममतांना मोठा झटका बसला आहे. 

पण या निर्णयाविरोधातही ममतांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ''निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीविरोधी आणि असंविधानिक असून त्याविरोधात उद्या धरणे आंदोलन करणार आहे. कोलकातामधील गांधींच्या पुतळ्यासमोर दुपारी 12 वाजता धरणे आंदोलन सुरू करणार आहे,'' असे ममतांनी म्हटले आहे. 

बंगालमधील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदार पार पडले असून अजून चार टप्पे शिल्लक आहेत. तृणमूलसाठी ममता बॅनर्जी या एकट्याच किल्ला लढवत आहेत. त्यातच त्यांच्या पायाला दुखापत झालेली असल्याने त्यांच्या प्रचाराला आधीच मर्यादा आल्या आहेत. पण त्यानंतर त्या भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दरम्यान, कूचबिहारमधील घटनेनंतर ममतांनी तिथे जाण्याची घोषणा केली होती. पण निवडणूक आयोगाना त्यांना तिथे जाण्यापासून रोखले आहे. त्यावर टीका करताना ममतांनी निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. ''निवडणूक आयोगाचे नाव बदलून एमसीसी म्हणजे मोदी कोड अॅाफ कंटक्ट करायला हवे. भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण मला आपल्या लोकांसोबत उभे राहण्यापासून आणि त्यांच्या दु:खात सहभागी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही,'' असे ट्विट ममतांनी केले आहे. 

निवडणूक आयोगाने कूचबिहारमध्ये जाण्यापासून तीन दिवस नेत्यांना मनाई केली आहे. रविवारी तृणमूलने ममता बॅनर्जी  तिथे जाणार असल्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोग आपल्याला केवळ तीन दिवस थांबवू शकतो. पण चौथ्या दिवशी मी माझ्या लोकांपर्यंत पोहचणार, असेही ममतांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com