पंतप्रधान मोदींनी कान टोचल्यानंतर केजरीवालांनी मागितली माफी - CM Arvind Kejriwal's Office Regrets live telecast of PM Modis meeting | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींनी कान टोचल्यानंतर केजरीवालांनी मागितली माफी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून पंतप्रधानांसोबतच्या बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

नवी दिल्ली : देशात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे विक्रम करत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून या बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीतच याबाबत नाराजी व्यक्त केली. 

पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी केजरीवाल यांना मध्येच थांबविले. त्यानंतर मोदी केजरीवालांना म्हणाले की, ''एखाद्या मुख्यमंत्र्यांनी इनहाऊस मीटिंगचे लाईव्ह प्रेक्षपण करणे हे आपली पंरपरा व प्रोटोकॅालच्या अतिशय विरोधात होत आहे. हे योग्य नाही. याचे आपण नेहमी पालन करायला हवे.'' एवढे बोलल्यानंतर पंतप्रधान मोदी शांत झाले. पण याचेही लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. 

पंतप्रधानांनी कान टोचल्यानंतर केजरीवाल यांनी लगेचच माफी मागितील. यापुढे अशी चूक होणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच बैठकीनंतर केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून खुलासाही करण्यात आला. यापूर्वी अशा प्रकारच्या बैठकांचे लाईव्ह प्रक्षेपण झाले आहे. मात्र, या बैठकीबाबत अशी कोणतीही सुचना नव्हती. त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

केजरीवाल यांनी बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण केल्यानंतर त्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. केजरीवाल या व्यासपीठाचा वापर राजकारण करण्यासाठी खोटी माहिती देण्यासाठी करत असल्याची टीका केंद्र सरकारकडून करण्यात आली. त्यांनी या बैठकीचा वापर राजकीय उद्देशाने केला. त्यांनी अॅाक्सीजन पुरवठा विमाने करण्याचा मुद्दा मांडला. पण त्यांना माहित नसेल की हे आधीपासून सुरू आहे, असे सरकारमधील सुत्रांनी सांगितले.

केजरीवाल यांनी रेल्वेच्या अॅाक्सीजन एक्सप्रेसविषयी मुद्दे मांडले. पण रेल्वेतील सुत्रांनी सांगितले की, केजरीवाल यांनी अशी कोणतीही मागणी केलेली नाही. केजरीवाल यांनी बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, याबाबत काहीच सांगितले नाही. केजरीवाल अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण करत आहेत. त्यांचे संपूर्ण भाषण कोणतेही उपाय शोधण्यासाठी नव्हते तर राजकीय होते, अशी टीकाही करण्यात आली. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख