srcw1.jpg
srcw1.jpg

राजीनाम्यानंतर राठोडांना चित्रा वाघ न्यायालयात खेचणार.. 

भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात नव्या संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे.

मुंबई : "पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला म्हणजे हे प्रकरण संपले असं नाही. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यासाठी व न्यायालयीन खटला पूर्णत्वास नेण्यासाठी संघर्ष करतच राहू," असा इशारा देत भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नव्या संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. 

राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्याहीपेक्षा जास्त रान उठवण्याचे काम वाघ यांनी केले होते. त्यांना आमदार आशीष शेलार, राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई आदींची मोठीच साथ मिळाली होती. राठोड यांच्या कालच्या राजिनाम्यानंतर श्रीमती वाघ यांनी काल रात्री उशिरा समाजमाध्यमांवर वरील प्रतिक्रिया दिली आहे. या लढ्यात साथ देणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही त्यांनी आभार मानले आहेत. 

महाराष्ट्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यानी संजय राठोड याचा राजीनामा घेतला याबद्दल आभार मानताना जर हा राजीनामा आला नसता तर हे निर्ढावलेपण महाराष्ट्राच्या देशातील प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र आजवर देशाला दिशा देत आला असताना इतके गंभीर प्रकार गपगुमान सहन करावेत, अशी परिस्थिती आम्ही नक्कीच येऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

'हा प्रश्न केवळ पूजा चव्हाण आणि संजय राठोड याचा नाही तर ही विकृती वेळीच ठेचायला हवी. राजीनामा झाला म्हणजे हे प्रकरण संपलं असं नाही. राजीनामा म्हणजे या प्रकरणाची सुरूवात आहे. पूजाला न्याय मिळण्यासाठीचं हे अगदी पहिलं पाऊल आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी अजूनही मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि आम्ही तो करू. पुराव्यांच्या आधारे हा खटला न्यायालयीन पातळीवर उभा करणे आणि शेवटाला नेणे हे आव्हानात्मक आहे व ते काम पूर्णत्वास नेऊच,' अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. 

प्रसारमाध्यमांचे आभार 
हा लढा पूजासारख्या असंख्य लेकींसाठी आहे. संजय राठोड प्रकरण हे केवळ या अत्याचाराचे उदाहरण आहे. या लढ्यात मी प्रखर भूमिका घेतली असली, तरी आपली साथ यात अत्यंत महत्त्वाची होती. माझ्या भूमिकेला आपण सर्वांनी व्यासपीठ मिळवून दिल्याने या लढ्याला मोठे बळ मिळाले. आपण आजवर दिलेल्या साथीबद्दल आपल्याला धन्यवाद देते. अशीच साथ पुढेही राहुद्यात, अशा शब्दांत वाघ यांनी हे प्रकरण उचलून धरणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही आभार मानले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com