चीननं करून दाखवलं; कोरोना लशीचे शंभर कोटीहून अधिक डोस दिले - China has passed the one billion mark of covid vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

चीननं करून दाखवलं; कोरोना लशीचे शंभर कोटीहून अधिक डोस दिले

वृत्तसंस्था
रविवार, 20 जून 2021

जगभरात सध्या अडीचशे कोटी डोस देण्यात आले आहेत.

बीजिंग : जगभरात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या चीनने लसीकरणामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. रविवारी चीनमध्ये कोरोना लशीचे तब्बल शंभर कोटींहून अधिक डोस नागरिकांना देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जगभरात सध्या अडीचशे कोटी डोस देण्यात आले असून त्यामध्ये चीनचा वाटा सर्वाधिक ठरला आहे. (China has passed the one billion mark of covid vaccination)

चीनमधील वूहान (Wuhan) शहरातून कोरोना विषाणूच्या संसर्गाला सुरूवात झाली. त्यानंतर काही महिन्यांतच या विषाणूने अवघ्या जगाला विळखा घातला. या विषाणूपासून बचावासाठी जगभरात प्रतिबंधात्मक लशींवर संशोधन सुरू झाले. मागील वर्षीच्या अखेरपर्यंत जगभरात अनेक लशी विकसित करण्यात आल्या. त्यानंतर वेगानं लसीकरणाला सुरूवात झाली. सुरूवातीला चीनमध्ये लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा होता. पण मागील काही दिवसांपासून यामध्ये चीनने मोठी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा : सावधान : दोनपेक्षा अधिक मुलं असल्यास सरकारी योजनांना मुकाल

चीनची लोकसंख्या सुमारे 140 कोटी एवढी आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात 100 कोटींहून अधिक कोरोना डोस देण्यात आले आहेत. किती नागिरकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या महिन्याच्या अखेरीस एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. तर वर्षअखेरीस हा आकडा 70 टक्क्यांपर्यंत नेला जाणार आहे. 

चीनमध्ये जून महिन्यात दररोज सरासरी जवळपास पावणे दोन कोटी डोस दररोज दिले आहेत. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत 100 कोटींचा टप्पा पार करता आला आहे. चीन वगळता जगभरात दररोज 3 कोटी 70 लाख डोस दिले जात आहेत. चीनमध्ये सध्या सात लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असून त्यापैकी पाच लशींचे दोन डोस द्यावे लागत आहेत. दोन डोसमध्ये आठ आठवड्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. 

चीनमध्ये या वर्षभरात 200 ते 300 कोटी लशींचे उत्पादन होऊ शकते. चीनमधील कोरोना संसर्गाचे प्रमाणही सध्या खूप कमी आहे. रविवारी चीनमध्ये केवळ 23 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांत लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख