कोरोना लसीकरणात भारत चीनपेक्षा चारपटीने मागे - China has four times more vaccinations than India | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

कोरोना लसीकरणात भारत चीनपेक्षा चारपटीने मागे

वृत्तसंस्था
रविवार, 20 जून 2021

चीनमध्ये सध्या दररोज सुमारे पावणे दोन कोटी डोस दिले जातात.​

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना (Covid-19) लशीचे तब्बल शंभर कोटींहून अधिक डोस नागरिकांना देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे भारताला अजूनही 30 कोटींचा टप्पाही पार करता आलेला नाही. चीनपेक्षा भारत लसीकरणामध्ये जवळपास चार पटीने पिछाडीवर आहे. चीनने काही दिवसांतच विक्रमी लसीकरण करत ही मजल मारली आहे. (China has four times more vaccinations than India)

जगभरात सध्या अडीचशे कोटी डोस देण्यात आले असून त्यामध्ये चीनचा वाटा सर्वाधिक ठरला आहे. सुरूवातीला चीनमध्ये लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा होता. पण मागील काही दिवसांपासून यामध्ये चीनने मोठी आघाडी घेतली आहे. चीनची लोकसंख्या सुमारे 140 कोटी एवढी आहे. देशात 100 कोटींहून अधिक कोरोना डोस देण्यात आले आहेत. या महिन्याच्या अखेरीस एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. तर वर्षअखेरीस हा आकडा 70 टक्क्यांपर्यंत नेला जाणार आहे.

हेही वाचा : सावधान : दोनपेक्षा अधिक मुलं असल्यास सरकारी योजनांना मुकाल

चीनच्या तुलनेत भारतातील लसीकरणाचा सध्याचा वेग खूप कमी आहे. चीनमध्ये सध्या दररोज सुमारे पावणे दोन कोटी डोस दिले जातात. भारतामध्ये हे प्रमाण 40 लाख एवढेही नाही. शनिवारी (ता. 20) भारतात 38 लाखांहून अधिक डोस देण्यात आले. त्यामुळं एकूण डोसचा आकडा 27 कोटी 60 लाखांपर्यंत पोहचला आहे. चीनच्या तुलनेत हा आकडा चारपटीने कमी आहे. जुलै महिन्यापासून भारताला अधिक डोस मिळण्याची शक्यता असल्याने लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. 

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोनच लशींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तर स्पुटनिक व्ही ही लस आयात करावी लागत असल्याने कमी प्रमाणत डोस आहेत. त्यामुळे भारताला सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहेत. मागणीच्या तुलनेत या कंपन्यांकडून होणारा पुरवठा तुलनेने कमी आहे. 

भारतामध्ये सोमवारी (ता. 21) जागतिक योग दिनानिमित्त 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. तसेच राज्यांनाही केवळ केंद्र सरकारकडून लशींचा पुरवठा केला जाईल. खासगा रुग्णालयांना थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लस मिळेल. रुग्णालयांमधील लशीच्या किंमतीही सरकारकडून निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्येही मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होऊ शकते.   

हेही वाचा : दोन आमदारांच्या मुलांना सरकारी नोकरी; मुख्यमंत्री अन् काँग्रेस प्रदेशाध्यक्षांमध्ये ठिणगी

दरम्यान, चीनमध्ये जून महिन्यात दररोज सरासरी जवळपास पावणे दोन कोटी डोस दररोज दिले आहेत. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत 100 कोटींचा टप्पा पार करता आला आहे. चीन वगळता जगभरात दररोज 3 कोटी 70 लाख डोस दिले जात आहेत. चीनमध्ये सध्या सात लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असून त्यापैकी पाच लशींचे दोन डोस द्यावे लागत आहेत. दोन डोसमध्ये आठ आठवड्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. 

चीनमध्ये या वर्षभरात 200 ते 300 कोटी लशींचे उत्पादन होऊ शकते. चीनमधील कोरोना संसर्गाचे प्रमाणही सध्या खूप कमी आहे. रविवारी चीनमध्ये केवळ 23 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांत लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख