विधान परिषदेची लॉटरी कुणाला..महाआघाडीतील तिन्ही पक्षांची प्रत्येकी चार नावे - chief minster uddhav thackeray will send 12 names to governor for mlc seats | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषदेची लॉटरी कुणाला..महाआघाडीतील तिन्ही पक्षांची प्रत्येकी चार नावे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीतील प्रत्येकी चार नावे मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत. मात्र, राज्यपाल यावर काय निर्णय घेतात याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.  

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष प्रत्येकी चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. यात कोणाच्या नावाची लॉटरी लागणार याची उत्सुकता आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे. 

राज्यपालनियुक्त सदस्य हे कला समाजसेवा या क्षेत्रातले असावेत, असा निकष आहे. यामुळे यात राजकीय नेत्यांची नावे पुढे करण्यावर मर्यादा आहेत. मात्र, राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून नावे पाठविताना तिन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तिन्ही पक्षांकडून नावांवर खल सुरू आहे. 

शिवसेनेने समाजसेवा, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील नावेच पुढे पाठवण्याचे ठरवले आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे यांची नावे निश्चित झाली आहेत. युवासेनेला प्रतिनिधित्व की उध्दव ठाकरे यांची विश्वासू मिलिंद नार्वेकर असा तिढा आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्या काळात सुभाष देसाई, संजय राउत आणि मिलिंद नार्वेकर या तिघांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. त्यातील नार्वेकर यांना अद्याप राजकीय पद मिळाले नाही मात्र, त्यांचा विचार होणार की त्यांचे महत्व कमी करण्यासाठी युवा सेनेतील नवा चेहरा समोर आणणार हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही नावे पाठवण्यासाठी हालचाली सुरु ठेवल्या आहेत. राज्यपाल निकषात बसणारी नावेच मान्य करतील हे लक्षात घेत एकनाथ खडसे आणि राजू शेटटी यांची नावे पुढे पाठवायची का याबाबत चर्चाही झाली होती. खडसे यांच्या कन्या रोहिणी यांचे सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेता त्यांचे नाव पाठवायचा विचाराही सुरू आहे.

काँग्रेसची नावे अद्याप मुंबईतील पक्ष कार्यालयाला मिळालेली नाहीत. दिल्लीतून ही नावे अंतिम होऊन कोणत्याही क्षणी प्राप्त होतील, असे राज्यातले नेते सांगत आहेत. मात्र, रात्री उशीरापर्यंत ही नावे येथे पोहोचली नव्हती. काँग्रेसकडून सत्यजित तांबे, प्रवक्ते सचिन सावंत ,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रजनी पाटील या नावांबरोबरच मुजफ्फर हुसेन ,नसीम खान आणि डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचीही नावे चर्चेत आहेत. एका मंत्र्याने मात्र, दिल्लीतून अंतिम यादी येईपर्यंत काहीही सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख