मुख्यमंत्री योगी शिवरायांचा जयजयकार करतात आणि हे महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात ! : नितेश राणे  - Chief Minister Yogi applauds Shivaraya and asks for proof from Maharaj's family! : Nitesh Rane | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री योगी शिवरायांचा जयजयकार करतात आणि हे महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात ! : नितेश राणे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत..आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात..दुर्दैव्य ते आमचे ! असे सांगत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांची शिवसेनेने जी टर उडविली त्यांना निवडणुकीच्या मैदानात चारीमुंड्या चित केले तसेत त्यांचे पुत्र निलेश राणे यांनाही कोकणात खासदारकीला पराभव स्वीकारावा लागला.

शिवसेना सोडल्यानंतर राणे शिवसेनेवर विशेषत: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कडाडून हल्ला करीत आले आहेत. निलेश राणे तर दररोजच ट्‌विट करून ठाकरे पितापुत्रांचा समाचार घेतात. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील मुगल म्युझियमला छत्रपती शिवाजीमहाराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 

नितेश राणे यांनी म्हटले आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत..आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात..दुर्दैव्य ते आमचे ! वास्तविक नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. काही महिन्यापूर्वी राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे शिवरायांचे आपण वंशज आहात याचे काय पुरावे आहेत असे सांगत वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी राऊत यांच्याविषयी नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. 

आज नितेश राणे यांनी हाच मुद्दा पुन्हा उपस्थित करीत राऊत यांना टोला हाणला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर हे निमित्त साधून टीका केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख