असाही राजयोग; सासरे मुख्यमंत्री अन् जावई कॅबिनेट मंत्री... - Chief Minister Vijayans son in law has been included in the cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

असाही राजयोग; सासरे मुख्यमंत्री अन् जावई कॅबिनेट मंत्री...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 मे 2021

मंत्रीमंडळामध्ये दोन मंत्री वगळता सर्व नवीन चेहरे आहेत.

तिरूअनंतपुरम : विधानसभा निवडणुकीत सलग दसुऱ्यांचा ऐतिहासिक विजय मिळवत केरळमध्ये डाव्यांनी सत्ता स्थापन केली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री पी. विजयन यांनी गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 20 मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. पण कालचा दिवसही केरळसाठी ऐतिहासिक ठरला आहे. केरळ विधीमंडळात पहिल्यांदाच सासरे मुख्यमंत्री अन् जावई कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार आहेत.

विजयन हे 76 वर्षांचे असून मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. विजयन यांच्यासह 20 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. विजयन यांच्या मंत्रीमंडळामध्ये दोन मंत्री वगळता सर्व नवीन चेहरे आहेत. दोन दिवसांपूर्वीच कम्युनिस्ट पक्षाने मागील मंत्रीमंडळातील एकाही आमदाराला पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज शपथ घेतलेल्या 20 जणांमध्ये डाव्या पक्षातील एकाही जुन्या मंत्र्याचा समावेश नाही.

हेही वाचा : परमबीर सिंग खुनशी अन् भ्रष्टाचारी; पोलिस निरीक्षक घा़डगे सर्वोच्च न्यायालयात

पण नवीन मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री विजयन यांचे जावई पी. ए. मोहम्मद रियास यांचाही समावेश करण्यात आला आहे. सासरे मुख्यम्ंत्री अन् जावई कॅबिनेट मंत्री हा राजयोग केरळमध्ये जुळून आला आहे. मात्र, त्यावरून वादाची ठिणगीही पडली आहे. मागील सरकारमध्ये के. शैलजा यांचा समावेश होता. त्यांनी आरोग्यमंत्री असताना कोरोना काळात प्रशंसनीय कामगिरी केल्यामुळे त्यांचे केरळसह जगभरात कौतुक झाले आहे. पण या मंत्रीमंडळातून त्यांनाही डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये अनेकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. 

कोण आहेत पी. ए. मोहम्मद रियास

मंत्री रियास हे मुख्यमंत्री विजयन यांच्या कन्या टी. वीणा यांचे पती आहेत. सध्या ते डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीतही त्यांचा समावेश आहे. युवा नेता म्हणून त्यांनी राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी पी. एम. अब्दुल खादर यांचे ते पुत्र आहेत. 

रियास यांनी 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. यावर्षी विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी पहिल्यांदाच विधीमंडळात प्रवेश केला आहे. ते 45 वर्षांचे आहेत. आमदार वीणा जॅार्ज व रियास या मंत्रीमंडळातील सर्वात मंत्री ठरले आहेत. सीपीएमने नवीन चेहरे व तरूणांना संधी देण्याच्या निर्णयाचे रियास यांनी स्वागत केले. तरूणांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख