हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का? : उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना टोला

मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचे हिंदुत्व मानतो.
Chief Minister Uddhav Thackeray's criticism of BJP and Governor Bhagat Singh Koshyar
Chief Minister Uddhav Thackeray's criticism of BJP and Governor Bhagat Singh Koshyar

पुणे  ः ‘हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.... हिंदुत्व अंगामध्ये...धमन्यांमध्ये असावं लागतं आणि धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,’ अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणाऱ्या भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 

विशेषतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही राज्यातील मंदिरं उघडण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या वेळी पत्र पाठवून ठाकरे यांना तुम्ही हिंदुत्व सोडले आहे का? तुम्ही सेक्यूलर झाला आहात का? असे प्रश्न विचारले होते, त्यामुळे त्यांनाही ठाकरे यांनी टोला लागवल्याचे मानले जाते. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ‘सामना’चे संपादक, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्या वेळी हिंदुत्वाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्यपाल आणि भाजपवर निशाणा साधला.

राज्यात बहुमताचे सरकार असताना राजभवनमध्ये समांतर सरकार चालू आहे. या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जाऊ द्या हो, करूद्यात त्यांनाही मजा.’

भाजप आणि राज्यपाल आपल्याला तुम्ही हिंदुत्व सोडलंय का? असा समान प्रश्न विचारत आहेत. यावर ठाकरे यांनी सांगितले की, ‘हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.... हिंदुत्व अंगामध्ये...धमन्यांमध्ये असावं लागतं आणि धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट आम्ही सोडू शकत नाही.’

‘मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचे हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की मला देवळात घंटा बडविणारा हिंदू नकोय...मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि त्यांनी ते १९९२-९३ मध्ये करून दाखविले. बाबरी मशीद पाडली, त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीनं सरकार आल्यानंतरही राम मंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळं तिकडं होतंय. राममंदिराचे श्रेय कुठल्याही पक्षाने घेऊ नये. कारण, तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही.

मग, हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे का. त्याने कोरोना जात नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. पहिलं या देशातील भगव्याचं स्वराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला हिंदुत्व...आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, असा सणसणीत टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com