मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "पुढील दोन महिने खबरदारीचे .."   - Chief Minister Thackeray said, "The next two months Be careful | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "पुढील दोन महिने खबरदारीचे .."  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री म्हणाले,  "कोरोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे.  आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे"

मुंबई : "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या राज्यस्तरीय अभियानाच्या माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य आहे. अनलॉकनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चित काळजीची गोष्ट असली तरी, मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर यावर खात्रीपूर्वक मात करण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आगामी काळात ट्रेकिंग आणि ट्रेसिंगची संख्या वाढवून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबईतील महापालिका उपायुक्त, वॉर्ड अधिकारी, डॉक्टर्स, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व पालिका अधिकाऱ्यांच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारसू उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले,  "कोरोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.  धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही.  कोरोना साथ नियंत्रणाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी गणपती, मोहरम अत्यंत संयमाने साजरे केले इथून पुढेही हाच संयम नागरिकांनी बाळगावा. 

मोहिमेत सर्वाना सहभागी करा. 'चेस दि व्हायरस' मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब , माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित आहोत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करुन घ्या."

"कोरोना ट्रॅकिंग ट्रेसिंग अधिक वेगाने वाढवावे लागेल. जबो रुग्णालये तात्पुरती आहेत या गैरसमजातूनही लोकांनी बाहेर यावे. डायलिसीस आयसीयूच्या सुविधा देण्याबाबतीतही मुंबई मागे राहिली नाही. आरोग्य हीच आताच्या घडीला प्राथमिकता आहे. परप्रांतीय मजूर परतत आहेत त्यांच्यावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दिवसाला 1000 किंवा 1100 रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे हे निश्चित आहे. "

ऑक्सिजनची वाढती गरज

सध्या आपण मुंबईत आणखी 5 ते 6 हजार बेडस उपलब्ध करून देऊ शकतो, पण पुढील काळात सुविधाही आणखी वाढवावी लागणार आहे. ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज आहे. ही वाढ अशीच राहिली तर बेड, ऑक्सीजनची कमतरता जाणवेल तशी वेळ येऊ न देणे आपल्या सर्वांच्या हाती आहे, " असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख