धक्कादायक : भाजप नेत्यांच्या मुलांना पास करण्यासाठी 'एमबीबीएस'च्या उत्तरपत्रिकाच बदलल्या - Changed answer sheets to pass for BJP leaders children in gujrat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

धक्कादायक : भाजप नेत्यांच्या मुलांना पास करण्यासाठी 'एमबीबीएस'च्या उत्तरपत्रिकाच बदलल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मार्च 2021

पुनर्तपासणीमध्ये तिघांच्या उत्तरपत्रिका पुर्णपणे बदलण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

अहमदाबाद : परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्याचे प्रकार घडत असतात. पण संपूर्ण उत्तरपत्रिकाच बदलण्याचा प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी उत्तरपत्रिका बदलण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. हे तिघेही भाजप नेत्यांची मुलं असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

गुजरातमधील पाटन येथील हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठामध्ये हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाने 2018 मध्ये घेतलेल्या परीक्षांमध्येही हे तिघे विद्यार्थी नापास झाले होते. पण पुनर्तपासणीमध्ये त्या तिघांनाही चांगल्या गुणांनी पास करण्यात आले. या पुनर्तपासणीवर काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत चौकशीची मागणी केली. त्यानुसार विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल आला असून त्यातील निष्कर्षाने विद्यापीठ हादरून गेलं आहे. 

पुनर्तपासणीमध्ये तिघांच्याही उत्तरपत्रिका पुर्णपणे बदलण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी करत असताना संबंधित तिघांना देण्यात आलेल्या गुणांचे लेखन आणि इतर विद्यार्थ्यांच्या गुणांच्या लेखनात तफावत आढळून आली आहे. त्यावरून या तिघांच्या उत्तरपत्रिकाच बदलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एम. पटले यांनी सांगितले. 

हेही वाचा : सक्तीने निवृत्त केलेल्या आयपीएसचा सरकारवर निशाणा; घराबाहेर लावला हा फलक

उत्तरपत्रिका बदलण्यात आलेले विद्यार्थी भाजप नेत्यांची मुलं असल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील पार्थ माहेश्वरी या एका विद्यार्थ्याचे नाव आतापर्यंत समोर आले आहे. पार्थची आई गुजरातमधील पालनपुर नगरपालिकेची माजी अध्यक्ष असून सध्या नगरसेविका आहेत. इतर दोन विद्यार्थीही भाजप नेत्यांचे नातेवाईक असल्याचे समजते. 

ही बाब समोर आल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जे. जे वोर गायब झाले आहे. या प्रकारामध्ये त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2018 मध्ये या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले तेव्हा ते रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या सहीने या तिघांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. या प्रकारानंतर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसचे आमदार किरीट पटेल म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात भाजप नेत्यांच्या मुलांना उत्तीर्ण केले जात आहे. त्यामुळे ही मुलं कशाप्रकारचे डॉक्टर बनतील हा प्रश्न आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख