Chandrkantdada Patil asks Rahul kul is he ready for Baramati By election may in near term | Sarkarnama

`बारामतीत लोकसभेची पोटनिवडणूक होऊ शकते.. कुल, तुम्ही तयार आहात ना?

रमेश वत्रे
शनिवार, 23 मे 2020

राजकारणात काहीही घडू शकते, असे सामान्य माणसे म्हणत असतात. पण महाराष्ट्रातील राजकीय नेते नव्या राजकीय समीकरणांच्या तयारीत तर नाहीत ना, अशी चर्चा चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नातून निर्माण झाली आहे. 

केडगाव : राष्ट्रवादी काॅंग्रेसने शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षांसाठी पाठिंबा दिला असून त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. यामुळेच नाराज होऊन अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावत भाजपशी हातमिळवणी केली होती, असेही मत या पुस्तकात व्यक्त करण्यात आले आहे.

यावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटत होतेच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे. (अर्थात राजकारणात अशा चर्चा तर नेहमीच होतात. पण आघाडीचे सरकार असल्यावर या चर्चा वारंवार होतात. या चर्चांना अनेकदा अर्थही नसतो.)  पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट कार्यकर्त्यांसमोर हा विषय उपस्थित केला. बारामती लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिडणूक होऊ शकते, राहुल कुल तुम्ही तयार आहात ना, असा सवाल पाटील यांनी या बैठकीत काल विचारला. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या चेकमेट या पुस्तकात राज्याच्या राजकारणात 2019 मध्ये घडलेल्या नाट्यमय आणि पडद्यामागील घडामोडीी उलगडून दाखवल्या. त्या पुस्तकात राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरल्याचे आणि त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचे म्हटले होते. 

पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक तयारीबाबत पाटील यांनी भाजपचे प्रमुख पदाधिकारी व आमदारांचा शुक्रवारी मोबाईलवर ग्रुप कॉल घेतला. या कॉलममध्ये दौंडचे आमदार राहुल कुलही सहभागी होते. ग्रुप कॉल चालू असताना चंद्रकांत पाटील यांनी राहुल यांना बारामती लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी तयार राहण्याची सूचना केली. हा विषय अचानक निघाल्याने कुल गडबडले. कुल यांनी वेळ मारून नेण्यासाठी पदवीधर मतदारसंघातील दौंडमधील कामाची माहिती देण्यास सुरुवात केली.

खुद्द प्रदेशाध्यक्षांनी हा विषय काढल्याने अनेकांना याचे आश्चर्य वाटले. हा मोठा ग्रुप कॉल असल्याने ही माहिती लगेच बाहेर आली. आणि या विषयाच्या चर्चेला उधाण आले. माध्यमांमध्येही चर्चा पोहोचली. कुल यांना अनेक पत्रकारांनी याबाबत विचारणा केली. पाटील यांनी हा प्रश्न मध्येच का उपस्थित केला असावा याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार, त्या मुख्यमंत्री झाल्यावर खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार.  मग पोटनिवडणूक लागणार असाच याचा अर्थ काढला जात आहे.

पक्षाचा आदेश आल्यावर पोटनिवडणुकीला तुम्ही तयार असणार का. यावर कुल म्हणाले, हा विषय आता का निघाला मला पण समजत नाही. मात्र पडद्यामागे काहीतरी घडत आहे, असे दिसते. निवडणुकीबाबत ज्या त्या वेळी ठरवू, असे त्यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे आणि राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत झाली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख