मुंबई : राज्य सरकारशी मतभेद झाल्याने पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी अर्ज केला होता. ते केंद्रीय सेवेत जाणार आहेत. याबाबत भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. आमच्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हा फारच घातक दिवस आहे की, सुबोधकुमार जैस्वाल यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जैस्वाल यांना निवृत्तीसाठी अद्याप दीड वर्षे बाकी आहेत. त्यामुळे पुढील दीड वर्षे ही मतभेदांत घालविण्याऐवजी आपणच दिल्लीला निघून जावे, असे त्यांनी ठरविले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जैस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस महासंचालक होण्याआधी ते मुंबईचे पोलिस आयुक्त होते. तेलगीने केलेल्या मुद्रांक घोटाळ्यात त्यांनी अनेक नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रणजित शर्मा यांना अटक करण्याचेही काम त्यांनी केले होते.
जैस्वाल यांची अशी पार्श्वभूमी असल्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ते निवृत्तीपर्यंत पदावर पुढे राहणार की नाही, याची शंका आधीपासूनच व्यक्त केली जात होती. ती आता खरी ठरली आहे. ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर राज्यात पुन्हा अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे देण्याचा प्रयत्न : अनिल परब https://t.co/ibfna6C7lQ
— Sarkarnama (@MySarkarnama) November 7, 2020
चंद्रकांत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात...
आता काही वेळापूर्वीच एक धक्कादायक आणि दुःखद बातमी वाचली. राज्याचे सर्वोच्च पोलिस अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल जी हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहेत अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील गेल्या काही महिन्यांमधील घटनांमुळे जैस्वाल यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भावनांना धक्का पोहोचला आहे. या महाभकास आघाडीच्या सरकारने सर्व धोरणांना बाजूला सारून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
भारताची गुप्तचर संघटना 'रॉ'मध्ये काम केल्यानंतर सर्वप्रथम 2018 साली श्री. जयस्वाल यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळला.
सरकार इतकी बहिरी आणि कुचकामी आहे की, पोलीस दलाला मजबूत करण्यासाठी श्री. जयस्वाल यांच्या सर्व सूचना आणि उपाययोजना धुडकावून लावत होती. याशिवाय त्यांच्या शिफारसीच्या विरुद्ध पुर्वीच्या ज्या पोलिसांना निलंबित केले गेले होते त्यांनाही पुन्हा पदावर नेमले गेले.
आमच्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हा फारच घातक दिवस आहे की, त्यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे.

