महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत ठाकरे सरकारला स्वस्थ बसू देणार नाही  - Chandrakant Patil criticizes Thackeray government for increasing atrocities against women | Politics Marathi News - Sarkarnama

महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत ठाकरे सरकारला स्वस्थ बसू देणार नाही 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

एवढे अत्याचार होऊनही राज्य सरकार या घटनांना रोखण्यासाठी काहीच हालचाल करत नाही.

मुंबई : "राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, महाआघाडी सरकार ढिम्म बसून आहे. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. राज्यातील महिला सुरक्षित बनेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महाआघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत,' असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. 

महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या विरोधात भाजपतर्फे सोमवारी (ता. 12 ऑक्‍टोबर) आयोजित राज्यव्यापी निषेध कार्यक्रमात पुणे येथे सहभागी होऊन पाटील यांनी हा इशारा दिला. 

भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी राज्यभर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, आशीष शेलार, मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा तसेच पक्षाचे प्रदेश स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. 

पाटील म्हणाले की, महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अत्याचाराची मालिकाच सुरु आहे. अल्पवयीन मुली, बालिकांवरही निर्घृण अत्याचार होत आहेत. मात्र, एवढे अत्याचार होऊनही राज्य सरकार या अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी काहीच हालचाल करत नाही. म्हणूनच या सरकारला जागे करण्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाय योजेपर्यंत भाजप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. 

खापरे म्हणाल्या की बालिका, अल्पवयीन मुली यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्याच्या घटना राजरोस घडत असताना राज्यकर्ते मात्र स्वस्थ बसून आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही.

कोविडवरील उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात महिलांवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यास अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी हे आंदोलन आहे. 

मुंबई येथे शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा मार्च काढून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. 

हेही वाचा : सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे काय? 

केडगाव (जि. पुणे) : "बाजार समित्यांना सेस गोळा करता येणार नाही, अशी तरतूद केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यात केली आहे. मात्र, बारामती बाजार समितीने पत्रक काढून सेस गोळा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अरे सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे. सेसचा मलिदा खायदा मिळणार नसल्याने विरोधकांची तडफड चालू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्ची टिकवण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहेत. त्यांना सेस, एफआरपी, हेक्‍टर हे काही कळत नाही, पण खुर्ची टिकवणे कळते,' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

भारतीय जनता पक्षाने बळिराजा सन्मान व ट्रॅक्‍टर पूजनच्या राज्यव्यापी रॅलीचा समारोप आज (ता. 11 ऑक्‍टोबर) चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) येथे करण्यात आला. रॅलीत 160 ट्रॅक्‍टरसह शेतकरी सहभागी झाले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. 

पाटील म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे कायदे केल्याने त्यांना धन्यवाद देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जादा पैसे मिळावेत, असे विरोधकांना वाटत नाही. या कायद्यामुळे दलाल, ठेकेदार, व्यापारी यांची गोची झाली आहे आणि त्यांचे नेतृत्व कॉंग्रेस व त्यांचे मित्र पक्ष करीत आहेत. राज्याने या कृषी विधेयकाला स्थगिती दिली आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयात ही स्थगिती टिकणार नाही.' 

 Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख