लशीची चिंता सोडा! आता कामाच्या ठिकाणीही मिळणार...

सध्या केवळ शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्येच ही लस घेता येत आहे.
लशीची चिंता सोडा! आता कामाच्या ठिकाणीही मिळणार...
Centre issues Guidlines to operationalise COVID Vaccination Centres at Work Places

नवी दिल्ली : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशभरात युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबविली जात आहे. देशात सध्या लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू असून देशभरात जवळपास नऊ कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच पुढील काळात लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार कामाच्या ठिकाणीही लस देण्यास सरकारने परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज याबाबतची माहिती देण्यात आली. लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. सध्या केवळ शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्येच ही लस घेता येत आहे. त्यामुळे लसीकरणाला मर्यादा येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आता खासगी व शासकीय कार्यालयांच्या ठिकाणीही लसीकरण करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना पत्र पाठविले आहे. ज्या कार्यालयांमध्ये 100 हून अधिक कर्मचारी आहेत आणि ते लस घेऊ इच्छितात त्या कार्यालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. देशात 11 एप्रिलपासून अशी लसीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत. याबाबतची नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे. देशात 45 ते 59 वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी लस उपलब्ध करून दिल्यास प्रवास टाळता येईल. तसेच कोरोना संक्रमण होण्याचा धोकाही कमी होईल, असे केंद्राने म्हटले आहे.

असे असेल लसीकरण केंद्र

खासगी किंवा शासकीय व्यवस्थापनाकडून लसीकरण केंद्राची मागणी झाल्यास जिल्ह्यातील टास्क फोर्स संबंधित ठिकाणी पाहणी करून केंद्र निश्चित करतील. संस्थेतील वरिष्ठ कमर्चारी नोडल अधिकारी असेल. त्यांच्यावर समन्वय व देखरेखची जबाबदारी असणार आहे. केवळ 45 वर्षांपुढील कर्मचाऱ्यांनाच लस घेता येईल. तसेच कर्मचाऱ्यांना कोविन पोर्टलवर नोंदणी करणे किंवा स्पॅाट नोंदणी आवश्यक आहे. प्रत्येक केंद्र सरकारी लसीकरण केंद्राशी जोडले जाणार आहे. 

पहिला डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी दुसरा डोस घेता येणार नाही. या कर्मचाऱ्यांना अन्य लसीकरण केंद्रावर जाऊनच दुसरा डोस घ्यावा लागेल. तसेच कामाच्या ठिकाणच्या केंद्रांवर एकाच कंपनीची लस उपलब्ध करून दिली जाईल. लसीचे दोन्ही डोस या केंद्रांवरच घ्यावे लागते. लशींमधील घोळ टाळण्यासाठी ही दक्षता घेतली जाणार आहे. शासकीय कार्यालयांमधील केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल. तर खासगी कार्यालयांमध्ये प्रती डोस 250 रुपये मोजावे लागतील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

Edited By Rajanand More
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in