राष्ट्रीय महामार्गाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार ; ठेकेदारांचे धाबे दणाणले.. - The CBI should check the work of national highways | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार ; ठेकेदारांचे धाबे दणाणले..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे सुरु आहेत.  या कामाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार रणजित निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे.

पंढरपूर : माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे सुरु आहेत. या कामांमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करत या कामाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे. खासदार निंबाळकरांच्या यामागणीनंतर आता ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूर- मोहोळ, पंढरपूर-सातारा, धुळे-रत्नागिरी, पंढरपूर- जत, सांगोला -कुर्डूवाडी या मार्गाना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून रस्ते बांधकामाला सुरवात देखील आहे. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहे.

पंढरपूर- मोहोळ या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु जमिनीचा मोबदला देताना दुजाभाव केला जात आहे. माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये प्रति गुंठा एक लाख रुपये तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रती गुंठा चार लाख रुपये या दराने जमिन अधिग्रहण केली जात आहे. नगरपंचायतीच्या हद्दीमधील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे यावेळी खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर- मोहोळ आणि रत्नागिरी -धुळे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरु झाल्याची माहिती असून या दोन्ही मार्गाच्या कामाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी खासदार निंबाळकर यांनी संसदेत बोलताना केली. पंढरपूर- म्हसवड या मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या मार्गाचे काम देखील तातडीने पूर्ण करावे, अन्यथा संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचेही  खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

 
तक्रारीनंतर लोकसभेत केली मागणी 

माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय मार्गासाठी केंद्र सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याच्या तक्ररी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आपण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी संसदेत केली आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख