भाजपची माघार; बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या नेत्याच्या पत्नीचं तिकीट कापलं - Candidature of Sangeeta Sengar wife of Kuldeep Singh Sengar has been cancelled | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपची माघार; बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या नेत्याच्या पत्नीचं तिकीट कापलं

वृत्तसंस्था
रविवार, 11 एप्रिल 2021

बलात्कार व हत्या प्रकरणामध्ये या नेत्याला न्यायालयाने 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला माजी आमदाराच्या पत्नीला भाजपने जिल्हा पंचायतच्या निवडणुकीत तिकीट दिलं होतं. पण विरोधी पक्षांसह सोशल मीडियावरही भाजपवर टीकेची झोड उठल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे. अखेर उमेदवारांच्या यादीतून भाजपने हे नाव वगळले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. उन्नावच्या फतेहपूर चौरासी येथून जिल्हा पंचायतच्या सदस्यपदासाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये संगीता सेंगर यांचे नाव होते. संगीता सेंगर या भाजपचे माजी आमदार कुलदीप सेंगर यांच्या पत्नी आहेत.

उन्नाव बलात्कार व हत्या प्रकरणामध्ये सेंगर यांना दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणानंतर भाजपने सेंगर यांना पक्षातून निलंबित केले. उन्नावमधील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात सेंगर यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीला तिकीट दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. संगिता सेंगर या भाजपकडूनच जिल्हा पंचायतच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. 

विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर भाजपने संगीता सेंगर यांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, फतेहपूर चौरासी वॅार्ड क्रमांक 22 मध्ये संगिता सेंगर यांना दिलेले तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्या भाजपच्या उमेदवार नसतील. या वॅार्डमध्ये पक्षाचा उमेदवाराची लवकरच घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संगिता सेंगर यांना तिकीट दिल्यानंतर भाजपमधूनच त्याला विरोधा होऊ लागला होता. तसेच समाजवादी पक्षासह इतर पक्षांनीही त्यावर जोरदार टीका केली. बलात्कारी नेत्याच्या कुटूंबातील सदस्याला तिकीट दिल्यामुळे भाजपवर टीकेचा भडिमार सुरू होता. निवडणुकीतही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे अखेर भाजपला माघार घ्यावी लागली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख