तेजस्वी, पायाला भिंगरी लावून फिरले, युवकांच्या मनात भरले !  - Bright, walking around with his legs crossed, filled the minds of the youth! | Politics Marathi News - Sarkarnama

तेजस्वी, पायाला भिंगरी लावून फिरले, युवकांच्या मनात भरले ! 

अमोल कविटकर 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

संपूर्ण निवडणूक काळात ‘माहोल’ करणाऱ्या तेजस्वी यादव यांचा बोलबाला या आकडेवारीतही पाहायला मिळत आहे. 

पाटणा : बिहार निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा शनिवारी संपल्यावर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल समोर यायला सुरुवात झाली.

प्रत्यक्ष निकाल काहीही लागला, तरी बिहारमधील नेतृत्व म्हणून तेजस्वी यांनी छाप उमटवली आहे, हे नितीशकुमार यांनाही मान्य करावे लागेल. पायाला भिंगरी लावून बिहार पालथे घालताना बेरोजगारीच्या मुद्द्यावर तरुण आणि नवमतदारांच्या मनात तेजस्वी यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

सलग दीड दशकांच्या नितीशकुमार यांच्या सत्तेविरोधात इतके तगडे आव्हान पहिल्यांदाच उभे राहिले आहे, तेही त्यांच्या राजकीय अनुभवापेक्षा कमी वयाच्या असलेल्या तेजस्वी यांच्याकडून. बिहारमध्ये हा संघर्ष दोन पक्षातील तर आहेच, पण दोन पिढ्यांचाही संघर्ष म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. 

नितीशकुमार यांनी १५ वर्षांच्या सत्तेच्या कालखंडात बिहारमध्ये रस्ते, वीज, पाणी आणि पायाभूत सुविधांबाबत केलेले काम समाधानकारक आहे, असे बोलले जाते. मात्र याच काळात वाढत गेलेला बेरोजगारीचा आलेख तेजस्वी यांनी अचूकपणे हेरला आणि हाच मुद्दा तेजस्वी यांनी निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणला. ‘आमचे सरकार आल्यावर लगेचच १० लाख सरकारी नोकऱ्या देऊ', अशी घोषणा तेजस्वी यांनी केली. 

नोकऱ्या कशा देणार? असा उलट प्रश्न तेजस्वी यांना विचारणाऱ्या जेडीयू आणि भाजपने १९ लाख नोकऱ्यांची घोषणा केली. 

तेजस्वी यांची मेहनत इतकी प्रचंड होती, की त्यांनी २१ दिवसांच्या प्रचार कालावधीत एकट्याने २५१ सभा घेतल्या. ही सरासरी १२ च्या आसपास आहे. तेजस्वी यांच्या मेहनतीपणाची जोरदार चर्चा झाली. 

‘मास्टर प्लॅन’ परिणामकारक ! 
भ्रष्ट्राचार प्रकरणात शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या चेहऱ्याचा वापर निवडणूक प्रचारात कुठेही करायचा नाही, असे नियोजन करताना केवळ तेजस्वी यांचाच चेहरा पुढे केला गेला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एनडीए ‘जंगलराज’चा मुद्दा पुढे करुन कोंडीत करायचा प्रयत्न करेल. तसा प्रयत्न झालाही, मात्र त्याची तरुण मतदारांनी फारशी दखल घेतली नाही. तेजस्वी यांनीही आई-वडिलांचे चेहरे न वापरता त्यांचे ‘केडर’ वापरून ही लढाई शेवटाला नेली. 

काँग्रेसला आरजेडीचा ‘हाथ’ ! 
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यंदा महागठबंधन करून रिंगणात असताना कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण तेजस्वी यांनी आखले होते. त्यांनी सर्वच्या सर्व २४३ विधानसभा मतदारसंघात तयारी केली होती. काँग्रेसला सोबत घेण्याचा निर्णय झाल्यानंतरस ‘आरजेडी’चे केडर सर्व बाजूने काँग्रेससाठीही झटताना दिसले. बिहारमध्ये काँग्रेसचे हाथ ‘आरजेडी’ने बळकट केले. 

नितीश यांचे ‘इमोशनल कार्ड’ 
तेजस्वी यांनी युवकांचे संघटन करताना सर्वच वयोगटातील मतदारांना प्रभावित केले. कोरोना संसर्गाच्या काळातही तेजस्वी यांच्या सभांना तुफान गर्दी होत होती. यामुळे राजकीय वाऱ्याच्या दिशेचा अंदाज सर्वांनाच आला.

त्यामुळेच की काय, पण प्रचाराच्या शेवटच्या सभेत ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असे सांगत ‘इमोशनल कार्ड’ खेळले. मात्र यावरून तेजस्वी यांनी या ‘यॉर्कर’ला ‘फुलटॉस’ करत ‘नितीशकुमार थकले आहेत, त्यांनी आता थांबायला हवे. हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत’, असे सांगून षटकार ठोकला.

नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) करण्यात आलाही, मात्र तोवर उशीर झाला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख