पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर नेट, सेट, पीएचडी धारकांचा बहिष्कार..  - Boycott of net, set PhD holders on Pune graduate constituency elections  | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर नेट, सेट, पीएचडी धारकांचा बहिष्कार.. 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

पदवीधर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यात पदवीधर आणि शिक्षकांचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश देवढे यांनी सांगितले.  

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवर बहिष्कार टाकून नोटा वापरण्याचा निर्णय पुण्यातील नेट, सेट, पीएचडी धारकांनी घेतला आहे. कोणालाही मतदान न करता नोटा वापरणार असल्याचं नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने जाहीर केलं आहे. पदवीधर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यात पदवीधर आणि शिक्षकांचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश देवढे यांनी सांगितले.  

राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ता. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवून आपलं नशीब आजमावलं प्रयत्न केला आहे. आता ते पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत. 
   
पुणे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार म्हणून रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अरूण लाड व उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर असून भारतीय जनता पक्षाकडून संग्राम देशमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शेखर मुंदडा, रवींद्र भेगडे यांच्यासह राजेश पांडे, शेखर चरेगावकर यांचेही नाव चर्चेत आहेत. 

ठोंबरे पाटील या पुण्याच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी नगरसेविका म्हणून 2012 ते 2017 या दरम्यान काम केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या शैक्षणिक व सामाजिक कामे करत असतात. विधी क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. दरम्यान, सध्या त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा म्हणून जबाबदारी संभाळत आहेत. 

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सर्वपक्षीय चर्चेतील उमेदवारांची नावे बघता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक एकत्रित लढण्यात येणार आहे. महाआघाडी तसेच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नसली तरी येत्या दोन-तीन दिवसांत दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. मनसेच्या वतीने वकील असलेल्या रूपाली पाटील-ठोंबरे यांची उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख