आरक्षणासाठी आता सरकारच्या विरोधात रक्तदान.. - Blood donation now for reservation against the government | Politics Marathi News - Sarkarnama

आरक्षणासाठी आता सरकारच्या विरोधात रक्तदान..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

तीन दिवसांमध्ये राज्यभरातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक धनगर समाज बांधवांनी रक्तदान करुन सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त केला आहे.

पंढरपूर : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्य सरकारच्या विरोधात रक्तदान चळवळ सुरु केली आहे. त्यांच्या या अनोख्या रक्तदान आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्ये राज्यभरातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक धनगर समाज बांधवांनी रक्तदान करुन सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणा नंतर आता धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 25 सप्टेंबर रोजी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ढोल बजावो, सरकार जगावो असे आंदोलन करण्यात आले होते. त्यांच्या या आंदोलनात राज्यभरातील धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटात झालेल्या या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर हे स्वतः सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आरक्षणाची मागणी करत सरकारला धारेवर धरले होते.

सध्या देशात आणि राज्यात कोरोना महामारीचे मोठे संकट उभे  आहे. अशा संकट काळात अनेक रुग्णांचे रक्ताअभावी प्राण जात आहेत. सध्या राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा देखील निर्माण झाला आहे. हीच मानवतेची  गरज ओळखून आमदार पडळकर यांनी रक्तदान चळवळ सुरु केली आहे. ही चळवळ राज्यभरात दहा दिवस राबवली जाणार आहे.

1 आॅक्टोबर पासून रक्तदान चळवळ आंदोलनाला सुरवात झाली आहे. अवघ्या तीन  दिवसात राज्यभरातील सुमारे साडेतीन  हजाराहून अधिक धनगर समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी करत स्वतःचे रक्त सरकारला दिले आहे.
रक्तदान आंदोलन पुढचे सात दिवस सुरु राहणार आहे. या काळात जवळपास दहा ते पंधरा हजार  रक्त बाटल्यांचे संकलन करुन ते सरकारला दान करण्यात येणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यात ही  रक्तदान आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस,मोहोळ आदी भागातील जवळपास 1 हजार 13 लोकांनी रक्तदान करुन या आरक्षण मागणी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती धनगर आरक्षण कृती समितीचे प्रा.सुभाष मस्के व बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिली. 

धगनर समाजाचे गेल्या चार पिढ्यांपासून या राज्यकर्त्यांनी शोषण केले आहे. आता तरी आम्हाला न्याय द्यावा. आऱक्षण मागणीसाठी आमचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणूनच सरकारला रक्ताचे दान करणार आहे. आतापर्यंत साडेतीन हजार बाटल्या रक्त संकलन झाले आहे. सात आॅक्टोबर पर्यंत हे रक्तदान आंदोलन सुरु राहणार आहे. सुमारे दहा हजाराहून अधिक बाटल्या रक्त संकलन करुन आम्ही ते सरकारला दान करणार आहे.
गोपीचंद पडळकर, आमदार  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख