पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अमित शहांना विश्वास  - BJP will get a clear majority in West Bengal, Amit Shah believes | Politics Marathi News - Sarkarnama

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अमित शहांना विश्वास 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या राज्याकडे भाजपने विशेष लक्ष्य दिले आहे

बंकुरा (पश्‍चिम बंगाल) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्‍चिम बंगालमध्ये राजकारणाचा धुरळा उडविला आहे. त्यांच्या दौऱ्यांने राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधान आले आहे.

पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला कोणत्याही परिस्थितीत खाली खेचण्याचा निर्धार भाजपने विशेषत: अमित शहा यांनी केला आहे. 

बिहारपाठोपाठ आता पुढील वर्षीे पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. येथे गेल्या नऊ वर्षापासून तृणमूल कॉंग्रेसची सत्ता आहे. ममता बॅनर्जी या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेतच शिवाय मुख्यमंत्रीही आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या राज्याकडे भाजपने विशेष लक्ष्य दिले आहे आणि येथे विजयश्री खेचून आणण्याची जबाबदारी स्वत: अमित शहा यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.

यापूर्वीही त्यांनी या राज्याचे दौरे केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी येथील वातावरण पार ढवळून काढले होते. त्यांच्यानंतर आलेले अध्यक्ष जे. पी. नड्डा हे ही वारंवार पश्‍चिम बंगालमध्ये जात असतात. 

नड्डांपाठोपाठ आता अमित शहा दोन दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. काल ते पश्‍चिम बंगालमध्ये पोचले आहेत. भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे त्यांच्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन सांत्वन केले आहे. बंकुरा येथे बोलताना शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

अमित शहा म्हणाले, की पश्‍चिम बंगालमधील जनता आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर खूपच चिडले आहे. त्याचा परिणाम पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसून येतील. भाजप पश्‍चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल आणि आम्हाला पूर्ण बहूमत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

शहा यांनी आपल्या दौऱ्याबाबत ट्‌विट करताना म्हटले होते की मी पश्‍चिम बंगालमध्ये जात आहे. तेथे मी विविध संघटनांच्या नेत्यांशी तसेच भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. 

दरम्यान, बंकुरा येथे थोर आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी मुंडा यांच्या कार्याला सलाम करीत त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या त्यागाची आणि कार्याची आठवणही करून दिली. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख