मुंबई : लॉकडाउनकाळातील जादा वीज बिलांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना तीन दिवसात बिलांमध्ये सवलत न दिल्यास मंत्रालयात शिरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिला आहे.
राज्य वीज मंडळाच्या गोंधळामुळे वीज ग्राहकांना लॉकडाउन काळात भरमसाठ बिले आली होती. या जादा बिलांपैकी निदान छोट्या ग्राहकांना तरी सवलत द्यावी, अशी भाजपची मागणी होती. बिलांमध्ये सवलत देण्याचे प्रथम सरकारने जाहीर केले होते. मात्र अर्थखात्याने आक्षेप घेतल्यामुळे आता अशी सवलत मिळणार नाही, ग्राहकांनी संपूर्ण विजबिले भरावीत, असे नुकतेच उर्जामंत्र्यांनी जाहीर केले होते. या फसवणुकीविरोधात आता भाजपने रणशिंग फुंकले आहे.
याप्रकरणी विविध मार्गांनी आंदोलने करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सोमवारपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. सरकारने केलेल्या या फसवणुकीच्या निषेधार्थ आज भाजपच्या मुंबई महिला आघाडीतर्फे वीज मंडळाचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगडावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार मनीषा चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई आदी हजर होत्या. यावेळी भातखळकर यांनी सरकारला हा इशारा दिला.
"शिवसेनेला जनता पाताळात गाडेल.." अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 20, 2020
महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षात बेबनाव असल्यानेच वीजग्राहकांना सवलत मिळाली नाही, असे भातखळकर यांनी दाखवून दिले. राज्याच्या उर्जामंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतु उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे ही सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करीत आहे. जोपर्यंत राज्यातील जनतेला 300 युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही भातखळकर यांनी दिला. कोरोनाच्या काळात भरमसाठ व अंदाजे वीज बील देणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता 'शॉक' दिल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

