भाजपचा प्रचाराचा धडाका...राष्ट्रवादीत, मात्र शांतताच... - BJP strong campaign in Pune graduate constituency There is still peace in NCP | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचा प्रचाराचा धडाका...राष्ट्रवादीत, मात्र शांतताच...

उत्तम कुटे
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

शहरातील शिक्षण संस्था, त्यांचे प्रमुख, तेथील मतदार शिक्षक, पदवीधर यांच्या बैठका खुद्द चंद्रकांत पाटील यांनी घेतल्या आहेत.

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपने प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मतदारसंघातील उमेदवार सांगलीचा असला, तरी तो जणू काही शहरातीलच असे समजून शहर भाजपने प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले असून प्रचार बैठकांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटात म्हणावी तेवढी लगबग दिसून आलेली नाही. त्यांचा एकही मोठा नेता शहरात अद्याप आलेला नसून त्यांचे एकमेव आमदारही या प्रचारात तेवढे सक्रिय आढळलेले नाहीत.

भाजपचे शहरातील दोन्ही आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप हे स्वतः तर जोरात कामाला लागले आहेतच, शिवाय त्यांनी आपले पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही त्यात सहभागी करून घेतले आहे. मतदारनोंदणीपासून ते प्रचारापर्यत भाजप ही राष्ट्रवादीवर पहिल्यापासून शहरात आघाडीवर आहे. शहराध्यक्ष महेशदादांनी अगदी प्रभाग पातळीपर्यंतच्या बैठका घेतल्या आहेत. प्रभाग स्तरापर्यंतच्या निवडणूक याद्याही त्यांनी तयार केल्या आहेत. त्या सबंधितांकडे सोपविण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेच्या या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान अत्यल्प होत असल्याने ते वाढविण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसाठी पत्रकच तयार केले आहे. मतदान बाद होऊ नये, याचा व्हिडिओ सुद्धा तयार केला गेला आहे. शहरातील शिक्षण संस्था, त्यांचे प्रमुख, तेथील मतदार शिक्षक, पदवीधर यांच्या बैठका खुद्द चंद्रकांत पाटील यांनी घेतल्या आहेत.

भाजपची जोरदार तयारी सुरु असताना प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या गोटात म्हणावी अशी अपेक्षित लगबग दिसून येत नाही. एकूणच भाजप मस्त, तर राष्ट्र्वादी सुस्त असेच काहीसे चित्र शहरात आहे.राष्ट्रवादीच्या या निवडणुक तयारीसंदर्भात पदाधिकाऱ्यांच्या जेमतेम दोन बैठका पक्ष कार्यालयात झाल्या आहेत. मतदार नोंदणीचीही त्यांची तयारी दिसून आली नाही. मतदारनोंदणी मोहिम त्यांनी घेतली नाही. परिणामी म्हणावी तेवढी मतदारनोंदणी त्यांची झालेली नाही. तशीच स्थिती आता प्रचारातही आहे. प्रभाग बैठका नाहीत. मतदार याद्यांची तयारी नाही. मोठे नेते मार्गदर्शनाला आलेले नाही. एकूणच शहरात पक्षात मरगळ आल्यासारखी स्थिती आहे. अजितदादा तेवढे आले की सगळे स्थानिक नेते तेवढ्यापुरते एकत्र येतात आणि पुन्हा पहिल्यासारखी स्थिती होते. दुसरीकडे मतदान काही दिवसांवर आले आहे. तरीही राष्ट्रवादीकडून मतदार असलेल्या शहरातील शिक्षण संस्थांना भेटी देण्याचे किंवा कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावण्याचे सत्र अद्याप सुरु झालेले नाही.

पुणे जिल्हा ठरणार निर्णायकी   

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारसंख्येत ६१ हजार ८८६ नव्या मतदारांची भर पडली आहे. त्यातील बहुतांश म्हणजे जवळजवळ ८३ टक्के एवढ्या विक्रमी संख्येने मतदार पाचपैकी एकट्या पुणे जिल्ह्यात वाढले आहेत. या मतदारवाढीचा फायदा आपल्यालाच होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. पुणे पदवीधरचे दोन्ही प्रमुख उमेदवार (भाजपचे संग्राम देशमुख व राष्ट्रवादीचे अरुण लाड)हे सांगली जिल्ह्यातील आहेत. मात्र, त्यांचे भवितव्य निश्चीत करण्यात आणि पुणे पदवीधरच्या विजय, पराजयात, मात्र पुणे जिल्हा निर्णायकी ठरणार असल्याची चिन्हे यावेळी दिसत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरसाऱख्या महापालिकांत भाजप सत्तेत आले. तर, ग्रामीण भागात राष्ट्रवादी मजबूत आहे. दुसरीकडे शिक्षित मतदारसंघांतही मतदानाचा टक्का कमी आहे. त्यामुळे शहरी वा ग्रामीण कुठला मतदार आपला हक्क अधिक बजावतो, त्याला मतदानासाठी कोण बाहेर काढते, यावर निकाल फिरणार आहे.

(Edited  by : Mangesh Mahale)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख