दानवेंचे ते वैयक्तिक मत...भाजपचे ते अधिकृत मत नाही... चंद्रकांतदादांचा खुलासा..  - BJP state president Chandrakant Patil revelation regarding Raosaheb Danve Statement | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेंचे ते वैयक्तिक मत...भाजपचे ते अधिकृत मत नाही... चंद्रकांतदादांचा खुलासा.. 

सुनील पाटील 
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

रावसाहेब दानवे काय म्हणाले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत मत नाही," असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी आज केला. 

कोल्हापूर : "उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे म्हणूनच पाहिले पाहिजे. यामध्ये बाहेरील शक्ती असेल तर गृहविभागाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काय म्हणाले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत मत नाही," असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. 

'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. याबाबत चंद्रकांत पाटील यांचे मत जाणून घेतले. पाटील म्हणाले, "कृषी विधेयकामुळे देशातील शेतकरी नाराज नाही किंवा सरकारवर रागावलाही नाही. कालच्या बंदचा कसा फज्जा उडाला हे सर्वांनी पाहिले आहे. मोटार सायकल घेवून नेहमीच्या स्टाईल धाकधपट करुन फिरले म्हणजे असे झाले नाही.

बिहार, महाराष्ट्र, मध्यमप्रदेश, राजस्थानमध्ये कोठेही आंदोलन झाले नाही. मग शेतकरी नाराज आहे, हे कसे समजायचे. त्यामुळे, जे आंदोलन होत आहे. ते शेतकऱ्यांचेच समजूनच त्याला सामोरे गेले पाहिजे. यामध्ये काही बाहेरची शक्ती वापरली जात असेल तर ती गृहविभागाकडून तपासली जाईल. पण दानवेंचे व्यक्त केलेले मत हे भारतीय जनता पार्टीचे नसून त्यांचे वैयक्तिक आहे." 

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आश्चर्यजनक आरोप केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी नुकताच केला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय तुम्हाला तुमचा माल कुठेही नेऊन विकण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला बाजार समितीचा आठ टक्के कर भरण्याची गरज नाही. पण या चांगल्या निर्णयाला देखील विरोध केला जात असल्याचेही दानवे म्हणाले होते.

फुलंब्री तालुक्यातील कोलते टाकळी येथील आरोग्य केंद्राचे उद्धाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  केलेल्या भाषणात दानवे यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि काल पुकारण्यात आलेला भारत बंद यावर देखील भाष्य केले.  

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान या बाहेरच्या देशांचा हात आहे. या आधी देशात सीसीए आणि एनआरसीचा कायदा करण्याचा निर्णय झाला, तेव्हा देखील या देशातील मुसलमांनाना देशाबाहेर जावे लागेल,अशी भिती निर्माण करण्यात आली. पण एका तरी मुसलमानाला देश सोडून जावे लागले का? असा सवाल दानवे यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले त्यामुळे मका, सोयाबीन या पिकांना कधी नव्हे तो चांगला भाव मिळू लागला आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सगळा गहू केंद्र सरकार हमी भावने खरेदी करते. पण नव्या कृषी कायद्यामुळे आता सरकार आपला गहू खरेदी करणार नाही, असा गैरसमज झाल्यामुळेच या भागातील शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण सरकारने यापुढे देखील सरकारी खरेदी सुरूच राहणार असून, ती देखील हमीभावाने केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन चुकीचे असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख