SARKARNAMA EXCLUSIVE : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नाथाभाऊंना फोन             - bjp state president chandrakant patil dails eknath khadase | Politics Marathi News - Sarkarnama

SARKARNAMA EXCLUSIVE : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नाथाभाऊंना फोन            

कैलास शिंदे
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

जळगावातील राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला.... 

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकीय नाट्य आता रंगात आले आहे.  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा आणि तयारी जोरात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. याला खडसे यांनीही दुजोरा दिला आहे.

खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश येत्या गुरुवारी (ता.२२) होणार असल्याचे सर्वात प्रथम वृत्त `सरकारनामा`ने दिले होते. त्याला आता पुष्टी मिळत आहे. खडसेंच्या मुंबईत होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे चिन्ह खडसेंच्या फ्लेक्सवरून हटविण्यास सुरवात केली आहे.

मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडूनही खडसेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पक्ष सोडून जावू नये यासाठी चर्चा केली. याला खडसे यांनीही  दुजोरा दिला. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हा फोन खडसे यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश रोखण्यासाठीच असावा, अशी राजकीय चर्चा आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी या विषयावर आज पुन्हा विचारले. खडसेंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबद्दल त्यांनी खंडन केले. ते कुठेही जाणार नाहीत, सगळ्याचा हिरमोड होणार. भाजपचं नुकसान होईल, असे खडसे वागणार नाहीत. प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला एकनाथ खडसे उपस्थित होते. खडसे नाराज असतील त्यांची नाराजी दूर करतोय, ते पुन्हा सक्रिय होतील, असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खडसेंनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे वृत्त `सरकारनामा`ने दिले होते. मात्र खडसे आणि चंद्रकांत पाटील या दोघांनीही त्याचा इन्कार केला. मात्र जळगावातील खडसे समर्थकांच्या हालचाली पाहता भाजप सोडण्याचा आणि राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय हा झालेला आहे. त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे दिसून येते. खडसे यांचे निकटवर्तीय देखील तसेच सांगतात. विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून पाठवायच्या नावांसाठीची शिफारस येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर होईल. त्यात खडसे यांचे नाव असेल तर गुरूवारी त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश निश्चित असल्याचे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते सांगतात, 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख