मुख्यमंत्री, संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! 'अर्थात स्क्रीनवरून!

मायेचा स्पर्श घरबसल्या केलेला मायेचा स्पर्श त्यांच्यापर्यंत पोहोचतो. माझा दीड वर्षांचा अनुभव आहे. मी घरातूनच राज्य चालवतोय.
Uddhav Thackeray, Keshav Upadhye .jpg
Uddhav Thackeray, Keshav Upadhye .jpg

मुंबई : तौते चक्रीवादळाचा राज्याला मोठा फटका बसला. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मार्मीक शब्दांत टीका केली आहे. (BJP spokesperson Keshav Upadhyay criticizes Uddhav Thackeray)

ते ट्वीटमध्ये म्हणाले की ''देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आज कोकणात प्रत्यक्ष दाखल होत असतानाच मुख्यमंत्री, मात्र संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! 'अर्थात स्क्रीनवरून, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.  

उपाध्ये पुढे म्हणाले की ''मंगळवारची सकाळ उजाडली. सीएमसाहेबांना जाग आली आणि ते हॉलमध्ये आले. अलीकडे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो. डायनिंग रूम, तिथून लिव्हिंग रूम, कधीतरी कॉन्फरन्स रूम...पायाला भिंगरी लागल्यागत सीएमसाहेब फिरत असतात. आज सवयीप्रमाणे अगोदर डायनिंग रूममध्ये न जाता साहेबांनी प्रवासाची दिशा वळवली आणि प्रोटोकाल धावपळ उडाली. हॉलमधल्या स्टाफला कोणतीच पूर्व सूचना नसल्याने तेथील कर्मचारीही भांबावून गेले''. 

''तिकडे लक्ष न देता सीएमसाहेब आपल्या खुर्चीत बसले. खुर्चीच्या हातावर कोरलेल्या लाकडी सिंहांना कुरवाळत त्यांनी एक जांभई दिली. रात्री बराच वेळ आढावा बैठक सुरू होती. सारी माहिती मिळाल्यावर, संकटग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा, असे आदेश देऊनच सीएमसाहेब झोपी गेले. सीएमसाहेबांनी आदेश दिल्यामुळे संकटग्रस्त भागात पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरू झाली. तिकडे संकट वाढतच होते. झाडे कोसळत होती, घरे उद्ध्वस्त होत होती, भेदरलेली मुलंबाळ कोपऱ्यात बसून बाहेरचे तांडव पाहात होती. संकटग्रस्त भागातील आढावा बैठक बराच वेळ सुरू होती. सकाळी सीएमसाहेबांना रिपोर्ट पाठवायची जबाबदारी एकावर सोपवून सर्वांनी डिनर घेतले, आणि ते घरोघर परतले.'' 

''सीएमसाहेब हॉलमध्ये येताच त्यांच्या स्पेशल सीईओने कानाजवळ जाऊन काही सल्ला दिला, आणि साहेब गंभीर झाले. खुर्चीच्या हातावरच्या सिंहाना कुरवाळणे थांबवून ते मनगटातले धाग्याचे बंधन पिरगळू लागले. आता साहेब काहीतरी महत्वपूर्ण बोलणार हे सीईओने ओळखले होते. त्याने तातडीने खूण केली, आणि साहेबांसमोरच्या टीपॉयवर लॅपटॅाप सुरू झाला. सीईओने पलीकडे संकटग्रस्त भागात एका अधिकाऱ्यास फोन लावून संकटग्रस्त नागरिकांस तातडीने ऑनलाइन आणण्याच्या सूचना दिल्या होत्या''. (BJP spokesperson Keshav Upadhyay criticizes Uddhav Thackeray)

''काही क्षणांतच सीएमसाहेबांच्या लॅपटॅापच्या स्क्रीनवर संकटग्रस्त नागरिक मोठ्या अपेक्षेने सीएमसाहेबांकडे पाहात होते. सीएमसाहेबांनी चेहरा अधिक गंभीर केला, आणि ते बोलू लागले...'या संकटात मी तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून संकटाच्या छाताडावर पाय देऊन त्याला, पळवून लावले आहे. मदतीसाठी मी केंद्राला आजच पत्र पाठवणार आहे. माझ्या कोकणाचे अश्रू मी वाया जाऊ देणार नाही'...असे बोलून सीएमसाहेबांनी हात उचलला. स्क्रीनवर एक संकटग्रस्ताचे अश्रू अनावर झाले होते. साहेबांनी मायेने स्क्रीनवरील त्याच्या चेहऱ्यावर हात फिरविला. त्याचे स्क्रीनवरील अश्रू पुसले, आणि आभासी सांत्वन आटोपून सीएमसाहेब नव्या आभासी आढावा बैठकीसाठी तयार झाले''. 

''उठताउठता सीईओकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केले, व म्हणाले, संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी तिकडे जावे लागत नाही. मायेचा स्पर्श घरबसल्या केलेला मायेचा स्पर्श त्यांच्यापर्यंत पोहोचतो. माझा दीड वर्षांचा अनुभव आहे. मी घरातूनच राज्य चालवतोय..सीईओने मान हलवून कौतुकाने साहेबाकडे पाहिले. तिकडे ऑफिसमधून प्रेसनोट जारी झाली होती, 'मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्तांचे अश्रू पुसले!' अशा शब्दात उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरातून काम करण्यावर भाष्य केले आहे''.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com